गोदावरी पात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर अंबड महसूल पथकाची पहाटे धाड; ६ हायवा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 11:44 IST2025-04-26T11:44:06+5:302025-04-26T11:44:38+5:30
तहसीलदार विजय चव्हाण यांच्या पथकाची पहाटे 3 वाजता कारवाई

गोदावरी पात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर अंबड महसूल पथकाची पहाटे धाड; ६ हायवा जप्त
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : अंबड तालुक्यातील आपेगाव गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे सहा हायवा तहसीलदार विजय चव्हाण यांनी शनिवारी पहाटे ३ वाजता पकडले. गोदावरी पात्रालगत केलेल्या या कारवाईत एकूण 3 कोटी 57 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांना अवैध वाळू वाहतुकीची गुप्त वार्ता मिळाली. त्यानंतर जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार चव्हाण यांच्या पथकाने आपेगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रात शनिवारी पहाटे 3 वाजेच्या दरम्यान धाड टाकली. महसूल पथक पाहताच 14 ते 15 हायवा व वाळू भरणारे 15 लोडर गोदावरी नदीपात्रातून साष्ट पिंपळगाव मार्गे पळून गेले. तर वाळूने भरलेले दोन हायवा व चार रिकाम्या हायवा महसूल पथकाने जप्त केल्या आहेत.
जप्त हायवावर २१ लाखांचा दंड
महसूल पथकाने पंचनामा करून पोलीस बंदोबस्तात जप्त केलेल्या हायवा अंबड तहसिल कार्यालयात हलविण्यात आल्या. या प्रकरणी जप्त करण्यात आलेल्या सहा हायवावर 21 लाख 36 हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. तसेच अवैध वाळू उपसा व वाहतुकीची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती आहे. आपेगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रात केलेल्या कारवाईने वाळू माफियायांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.