अजि सोनियाचा दिनु : कोरोनाचा आकडा शून्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:11+5:302021-07-07T04:37:11+5:30
जालना जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले होते. अनेक कुटुंबांतील कर्ता पुरुष या कोरोनाने हिरावून नेल्याने जवळपास ९० बालके अनाथ झाली ...

अजि सोनियाचा दिनु : कोरोनाचा आकडा शून्यावर
जालना जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले होते. अनेक कुटुंबांतील कर्ता पुरुष या कोरोनाने हिरावून नेल्याने जवळपास ९० बालके अनाथ झाली आहेत. तर अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसाय बुडाले आहेत. यामुळे गेले दीड वर्ष हे सर्वांसाठी एक आव्हानात्मक ठरले.
जालना जिल्ह्यात पाच लाख ६१ हजार कोरोनाच्या चाचण्या झाल्या. त्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण हे ६१ हजार २४९ आढळून आले होते. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ५९५९ झाली. कोरोनाने आतापर्यंत एक हजार १६७ मृत्यू झाले आहेत. सोमवारी सकाळपर्यंत ५८२ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या. त्यात आरटीपीसीआर चाचणी संख्या ही ४०७ आणि अँटिजन चाचणी १७४ झाल्या आहेत. यातून एकही रुग्ण कोरोनाबाधित आढळून आलेला नसल्याचे शासकीय अहवालात नमूद केले आहे.
चौकट
जिल्ह्यात १४० जणांवर उपचार
जालना जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित असलेल्या १४० जणांवर शासकीय तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातून १४ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी देखील सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. जालना जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
चौकट
काळजी घेणे गरजेचे
कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, ही बाब सकारात्मकच म्हणावी लागेल. असे असले तरी तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस एकही रुग्ण पॉझिटिव्ह सापडला नाही, या भ्रमात राहू नये. कोरोनाचे उच्चाटन पूर्णत: झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी आणखी कुठेच केलेले नाही. त्यामुळे जे नियम घालून दिले आहेत आणि ते आपण जवळपास सर्वांनीच पाळल्याने जिल्ह्यात कोरोना घटला आहे. असे असताना घाबरून न जाता काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.
रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी
चौकट
आरोग्य यंत्रणा झाली बळकट
कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेचे मध्यंतरी पितळ उघडे पडले होते. परंतु, सरकारने जवळपास कमी महत्त्वाची सर्व कामे बंद ठेवून सर्व निधी आरोग्य यंत्रणा बळकटीकरणावर भर दिल्याने आज जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा संपला आहे. स्वतंत्र कोविड लॅब मिळाली असून, त्याच्या चाचण्यांचे रिपोर्ट गतीने येण्यास प्रारंभ झाला आहे. कोरोनानंतरचे अन्य आजार तपासण्यासाठीची यंत्रणा येथे उपलब्ध आहे. यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, उद्योजक, दानशूर व्यक्तींनी देखील मोठे योगदान दिले आहे.