युवकाला चटके दिल्याप्रकरणात सोनू दौड याच्यानंतर आणखी दोघे जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:30 IST2025-03-07T16:29:49+5:302025-03-07T16:30:36+5:30
या प्रकरणी उद्धवसेना तालुकाप्रमुख नवनाथ दौड अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

युवकाला चटके दिल्याप्रकरणात सोनू दौड याच्यानंतर आणखी दोघे जेरबंद
भोकरदन (जि.जालना) : तालुक्यातील आन्वा येथील युवकाला चटके दिल्या प्रकरणात पारध पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, तर उद्धवसेना तालुकाप्रमुख नवनाथ दौड अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
२६ फेब्रुवारी रोजी जुन्या वादातून लोखंडी रॉड चुलीत तापवून कैलास बोराडे यांच्या अंगाला अनेक ठिकाणी चटके देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकारणात सोनू उर्फ भागवत सुदाम दौड, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा उद्धवसेना तालुकाप्रमुख नवनाथ दौड यांच्याविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सोनू उर्फ भागवत सुदाम दौड हा पोलिस कोठडीत आहे, तर नवनाथ सुदाम दौड हा फरार आहे. या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी रात्री अन्वा येथून गंगाधर काळे, रामू काळे या दोन संशयितांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे पारध पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष माने यांनी सांगितले. या प्रकरणात इतर संशयितांचा शोध घेतला जात असल्याचेही सांगण्यात आले.
जखमीवर प्लॅस्टिक सर्जरी
अंगाला गरम लोखंडी रॉडने चटके दिल्याने गंभीर जखमी झालेल्या कैलास गोविंदा बोराडे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.