लय भारी! जीआय मानांकनानंतर जालन्याच्या दगडी ज्वारीस सर्वाधिक दर, लागवडही वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:19 IST2025-06-06T16:18:29+5:302025-06-06T16:19:22+5:30
जालना जिल्ह्यातील १०० एकरवर झाली होती लागवड; उताराही चांगला मिळाल्याने शेतकरी समाधानी

लय भारी! जीआय मानांकनानंतर जालन्याच्या दगडी ज्वारीस सर्वाधिक दर, लागवडही वाढली
जालना : मागील वर्षी जालन्याच्या दगडी ज्वारीला भौगोलिक मानांकन अर्थात जीआय मानांकन मिळाले आहे. यानंतर जालन्यातील दगडी ज्वारीला प्रसिद्धी मिळत आहे. जालना जिल्ह्यातील सुमारे १०० एकरवर शेतकऱ्यांनी दगडी ज्वारीची लागवड केली होती. यातून शेतकऱ्यांना एकरी ९-१० क्विंटल उत्पादन मिळाले आहे. या ज्वारीला बाजारपेठेत तब्बल चार हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.
यापूर्वी जालना जिल्ह्यातील माेसंबीला जीआय मानांकन मिळाले आहे. यानंतर मोसंबीला नवी ओळख मिळाली आहे. यामुळे माेसंबीला देशात व विदेशात मागणी वाढली आहे. मागील वर्षी जालन्याच्या दगडी ज्वारीला जीआय मानांकन मिळाले आहे. या ज्वारीलादेखील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथील जय किसान शेतकरी गटाचे भगवान मात्रे यांनी जालना जिल्ह्यातील दगडी ज्वारीला भौगोलिक मानांकन अर्थात जीआय मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न केले होते. पेटंट विभागाने या दगडी ज्वारीला मागील वर्षी भौगोलिक मानांकन दिले आहे. मात्रेवाडी, पाडळी, वरूडी आदी परिसरात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात दगडी ज्वारीची लागवड केली होती.
शेतकऱ्यांचा प्रतिसाद
बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ६० रुपये प्रतिकिलो याप्रकरणे ज्वारी दगडीचे बियाणे घेऊन गेले होते. यातून तालुक्यात जवळपास १०० एकरवर दगडी ज्वारीची पेरणी झालेली होती. यंदा दगडी ज्वारीतून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न प्राप्त झाले आहे. कमी पाण्यामध्ये दगडी ज्वारीचे चांगले उत्पन्न मिळत असल्याने हे वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. शेतकऱ्यांना एकरी ९ ते १० क्विंटल उत्पादन मिळाले असून, प्रतिक्विंटल चार हजार रुपये असा उच्च दर मिळाल्याचे भगवान मात्रे यांनी सांगितले.