वडिलानंतर मुलाला मिळाले पंचायतराज समितीचे अध्यक्षपद; राज्यमंत्री पदाचा आहे दर्जा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 18:26 IST2025-02-25T18:21:00+5:302025-02-25T18:26:03+5:30
रावसाहेब दानवे १९९६ मध्ये तर मुलगा संतोष दानवे यांना २०२५ मध्ये मिळाले पंचायत राज समितीचे अध्यक्ष पद

वडिलानंतर मुलाला मिळाले पंचायतराज समितीचे अध्यक्षपद; राज्यमंत्री पदाचा आहे दर्जा
- फकिरा देशमुख
भोकरदन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदार संतोष दानवे यांची महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वडिल रावसाहेब दानवे यांच्यानंतर मुलगा संतोष दानवे यांना पंचायतराज समितीचे अध्यक्ष पद मिळाले आहे. मात्र, ६२ वर्षांपासून या मतदारसंघास येथील लोकप्रतिनिधीस राज्यमंत्रीमंडळात मंत्रीपदाची संधी मिळण्याची आस आहे.
आमदार संतोष दानवे हे भोकरदन मतदार संघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी मतदारांना आशा होती. मात्र, जालना जिल्हयातील सर्व आमदार महायुतीचे निवडून येऊनही जिल्हा मंत्रीपदापासून वंचित राहिला. आता याची भरपाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संतोष रावसाहेब दानवे यांना पंचायत राज समितीचे अध्यक्ष पद देऊन केली आहे. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या या पदावर तरुण आमदाराची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, दिवंगत गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी रावसाहेब दानवे यांना पंचायत राज समितीचे अध्यक्ष पद दिले होते. त्यानंतर आता त्यांचे पुत्र संतोष दानवे यांना यांची या पदी निवड झाल्याने मतदारसंघात स्वागत करण्यात येत आहे.
मतदारसंघ चारवेळा पंचायतराज पद, पण मंत्रीपदापासून वंचित
भोकरदन मतदार संघाने अनेक वेळा सत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून दिला आहे. मात्र, दिवंगत भगवंतराव गाढे यांचा 1957-ते 62 यांचा अपवाद सोडला तर गेल्या 62 वर्षांपासून या मतदार संघातील लोकप्रतिनिधीला राज्याच्या मंत्रीमंडळात संधी मिळाली नाही. आतापर्यंत या मतदार संघातील चार आमदारांना पंचायत राज समितीचे अध्यक्ष पद मिळालं आहे. त्यामध्ये 1987 ला शंकरराव चव्हाण यांच्या काळात काँग्रेसचे आमदार संतोषराव दसपुते यांची पहिल्यांदा हे पद मिळाले. त्यानंतर 1996 ला रावसाहेब दानवे यांना तर 2009 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांना पंचायत राज समितीचे अध्यक्ष पद दिले होते. त्यानंतर आता आमदार संतोष दानवे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचायत राज समितीचे अध्यक्षपद दिले आहे. दरम्यान, 2014 - 19 ला रावसाहेब दानवे यांना केंद्रात राज्यमंत्री पद मिळाले होते. मात्र, येथील लोकप्रतिनिधीला राज्य मंत्रीमंडळात अद्याप संधी मिळाली नाही. येणाऱ्या काळात ती उणीव भरून निघेलही.