जामीनावर बाहेर येताच पुन्हा अवैध सोनोग्राफी यंत्र विक्रीत सक्रिय; जालन्यात टोळीच जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 12:16 IST2024-12-19T12:16:38+5:302024-12-19T12:16:54+5:30
जालना पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हा सामान्य रुग्णालयाची संयुक्त कारवाई

जामीनावर बाहेर येताच पुन्हा अवैध सोनोग्राफी यंत्र विक्रीत सक्रिय; जालन्यात टोळीच जेरबंद
जालना : गर्भलिंग तपासणी करण्यासाठी आणण्यात आलेली जुनी अवैध सोनाग्राफी मशीन विक्री करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. मशीन खरेदी करण्यासाठी डमी ग्राहक पाठवण्यात आले. बुधवारी मशीन विक्रीसाठी आल्यानंतर आरोपीस ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. राजेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मशीन विक्री करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश झाल्यामुळे जिल्ह्यातील कोणत्या हॉस्पिटल्समध्ये असे यंत्र देण्यात आलेले आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे.
जुनी सोनोग्राफी यंत्र विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांना मिळाली होती. यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. सोनाग्राफी यंत्र विकणाऱ्या टोळीच्या शोधासाठी पोलिस आणि जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले. यंत्र विक्री करताना आरोपीस बुधवारी जालना शहरातील कलावती हॉस्पिटलसमोरील रस्त्यावरून ताब्यात घेण्यात आले. अवैध सोनोग्राफी यंत्राची विक्री प्रकरणी संदीप कैलास गाेरे (वय २३, रा. भिलपुरी, ता.जि. जालना), सोमनाथ परसराम बारसे (वय ३०, रा. हनुमाननगर, वाळूज, छत्रपती संभाजीनगर), (योगेश शालिकराव धांडे, वय २२, रा. चाळगेनगर, इंदेवाडी, ता.जि. जालना) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून पाच लाख रुपये किमतीचे गर्भलिंग निदान करणारे सोनोग्राफी यंत्र, एक स्विफ्ट डिझायर कार, एक टीव्हीएस कंपनीची स्कुटी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गर्भधारणापूर्व आणि प्री-नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक्स (पीसीपीएनडीटी) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनात डाॅ. बेबी सरोज घोलप, ॲड. सोनाली कांबळे, डाॅ. प्रज्ञा कुलकर्णी, डॉ. ज्ञानेश्वर वायाळ, शेख वसीम, शेख हनीफ, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पव्हरे, प्रशांत लोखंडे, सुधीर वाघमारे, योगेश सहाणे, कविता काकस, सत्यभामा काकडे, सौरभ मुळे यांनी केली.
आठ दिवस टोळीच्या संपर्कात
पोलिस आणि जिल्हा डॉक्टरांच्या पथकाने डमी ग्राहक पाठवून आठ दिवसांपूर्वी सोनोग्राफी यंत्र विकणाऱ्या टोळीशी संपर्क केला होता. टोळीतील मुख्य सूत्रधार आरोपी संदीप गोरे हा डमी ग्राहकास यंत्र विकण्यासाठी संपर्कात होता. अखेर बुधवारी सोनोग्राफी यंत्र देण्यात येईल, असे डमी ग्राहकास सांगण्यात आले. आरोपीकडून डमी ग्राहक यंत्र घेत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत तीन आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपीवर यापूर्वीही गुन्हे
टोळीचा मुख्य सूत्रधार संदीप गोरे यांच्यावर २०२२ मध्ये देखील अवैध गर्भलिंग तपासणी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. जालना शहरातील चंदनझिरा व बीड जिल्ह्यातील गेवराई पोलिस ठाण्यात देखील संदीप गोरेविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सध्या संदीप गोरे जामिनावर बाहेर आलेला होता.