देवीच्या दर्शनावरून परतणाऱ्या महिला भाविकाचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 15:51 IST2019-09-30T15:49:58+5:302019-09-30T15:51:50+5:30
जालना- औरंगाबाद महामार्गावरील त्रिमुर्ती चौकात अपघात

देवीच्या दर्शनावरून परतणाऱ्या महिला भाविकाचा अपघातात मृत्यू
चंदनझिरा : दुर्गामाता देवीचे दर्शन घेऊन घराकडे निघालेल्या महिला भाविकांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एका २४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास जालना- औरंगाबाद महामार्गावरील त्रिमुर्ती चौकात घडली.
मनीषा वैजिनाथ दळवी (२४) असे मयत महिलेचे नाव आहे. चंदनझिरा सत्यमनगर येथील मनीषा दळवी व सीमा विनोद इंगोले या दोघी सोमवारी पहाटे दुचाकीवरून (क्र. एम.एच.२१- बी. एम. ०७१०) जालना येथील दुर्गामाता देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. देवीचे दर्शन घेऊन त्या दोघी गावाकडे परतत होत्या. जालना- औरंगाबाद महामार्गावरील त्रिमुर्ती चौकात अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने मनीषा दळवी, सीमा इंगोले या गंभीर जखमी झाल्या. नागरिकांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी जालना येथील दवाखान्यात दाखल केले. मात्र, डोक्याला जबर मार लागल्याने मनीषा दळवी यांचा मृत्यू झाला. तर सीमा इंगोले यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत डॉ. गोविंद पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोकॉ अविनाश नरवडे हे करीत आहेत.