Accident on the worker's vehicle; One killed, 3 injured | मजुरांच्या वाहनाला अपघात; एक जण ठार, २५ जखमी
मजुरांच्या वाहनाला अपघात; एक जण ठार, २५ जखमी

ठळक मुद्देजालना : औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील घटना, सर्व मजूर मध्यप्रदेशातील

वडीगोद्री (जि. जालना) : मध्यप्रदेशातील मजुरांना गेवराई येथे घेऊन येणारी मालवाहतूक जीप उलटली. या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. दोघांची प्रकृती चिंताजनक असून, २२ मजूर किरकोळ जखमी झाले आहेत. यात महिला, पुरूषांचाही समावेश आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाट्याजवळ घडला.
मध्यप्रदेशातील ३० मजुरांना गेवराई येथील बाहुबली जिनिंग येथे कामासाठी एका वाहनातून (एम. पी. १०- जी. ११८२) आणण्यात येत होते. हे वाहन औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील दोदडगाव फाट्याजवळ (ता. अंबड) शुक्रवारी सकाळी आले असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटल्या गेले. रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात जाऊन पडले. या अपघातात वाहनातील २५ मजूर जखमी झाले. पैकी तिघे गंभीर तर २२ जणांना किरकोळ दुखापत झाली होती. घटनेची माहिती मिळताच रूग्णवाहिकेतून व इतर वाहनातून जखमींना पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दिनेश छतरसिंग सोलंकी (२६ रा. शिरवेल जि. बडवानी, मध्यप्रदेश) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर संगीता सोलंकी (१५ ), पप्पू रमेश चव्हाण (२० रा. आमसरी ता. भगवानपुरा, जि. खरगोन), गणेश काकडी जमरे (२१ रा. शिरवेल), तुकाराम ब्राम्हणे (१२ रा. आमसरी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन), बिला गणेश जमरे (१८ रा. शिरवेल), संगीता भुवरे (१८), स्नेहल, शीतल यादव (२२), वर्षा सोलंकी (२०), मंजू कांतीलाल दुवे (२०), रेवती हिरालाल सोलंकी (२४), घोडेलाल जलसिंग भुवरे (२४ सर्व रा. शिरवेल) हे मजूर जखमी झाले.
वाहनचालक फरार
अपघात झाला त्यावेळी वाहनातील अनेक मजूरही झोपेत होते. चालकाला झोप लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले
आणि अपघात झाल्याचे काही मजुरांनी सांगितले.
अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून, पोलीस त्याचा
शोध घेत आहेत.

Web Title: Accident on the worker's vehicle; One killed, 3 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.