अबब ! मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाला आले महिन्याचे ३१ हजार रुपयांचे वीजबिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 04:12 IST2021-03-29T04:11:39+5:302021-03-29T04:12:47+5:30
electricity bill news : : महावितरणकडून मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाला एका महिन्याचे ३१ हजार रुपये वीजबिल देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अबब ! मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाला आले महिन्याचे ३१ हजार रुपयांचे वीजबिल
तळणी (जि. जालना) : महावितरणकडून मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाला एका महिन्याचे ३१ हजार रुपये वीजबिल देण्याचा धक्कादायक प्रकार तळणी (ता. मंठा) येथे समोर आला आहे.
चतुराबाई मारोती मस्के असे वीज मीटर ग्राहकाचे नाव आहे. त्यांनी मागील महिन्यात १४९० रुपये वीजबिल भरले असताना त्यांना एका महिन्यात २ हजार ३४७ युनिट वीज वापर केला म्हणून ३१ हजारांचे वीजबिल महावितरणकडून देण्यात आले.
मार्च अखेर महिन्यात वीजबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल, असा दम लाइनमनने दिला आहे. सदर कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहे. त्यातच कोरोनामुळे आर्थिक गणित बिघडले असतानाच महावितरणचे ३१ हजार वीजबिल भरावे कसे, हा प्रश्न मस्के कुटुंबाला सतावत आहे.
अंदाजे रीडिंगचा फटका
महावितरणने घरगुती वीज मीटरधारकाची रीडिंग घेण्याचे काम खाजगी कंपनीला दिले आहे. मात्र, संबंधित कंपनीकडून अंदाजे रीडिंग टाकण्यात येत असल्याने अव्वाच्या सव्वा वीजबिल येत असल्याचा आरोप गौतम सदावर्ते यांनी केला आहे.
महावितरणची चुप्पी
मंठा महावितरणचे कनिष्ठ अभियंता ए. एस. जंगम यांच्याशी संपर्क साधल्यानंतर अतिरिक्त वीजबिलप्रश्नी त्यांनी चुप्पी साधली.