नाईट शिफ्टवरून घरी परतणाऱ्या कामगाराला भरधाव ट्रकने चिरडले
By दिपक ढोले | Updated: February 24, 2023 16:47 IST2023-02-24T16:47:35+5:302023-02-24T16:47:59+5:30
जालना - औरंगाबाद रोडवरील घटना; पोलिसांनी ट्रक चालकास अटक केली आहे

नाईट शिफ्टवरून घरी परतणाऱ्या कामगाराला भरधाव ट्रकने चिरडले
जालना : भरधाव ट्रकने धडक दिल्याने एका कामगाराचा चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना जालना-औरंगाबाद मार्गावरील सनराईज हॉटेलसमोर गुरुवारी मध्यरात्रीनंतर एक वाजेच्या सुमारास घडली. अशोककुमार ब्रीजबिहार भगत (२५ रा. चंदनझिरा) असे मृत कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी ट्रक चालकास अटक केली आहे.
शहरातील औद्योगिक वसाहतीतील एका स्टील कंपनीत काम करणारे चार ते पाच कामगार रात्रीची शिफ्ट संपल्यानंतर घरी जाण्यासाठी पायी निघाले होते. रात्री एक वाजेच्या सुमारास औरंगाबाद रोडवरील सनराईज हॉटेलसमोर रोड ओलांडत असताना अशोककुमार भगत यास ट्रक (क्र.एमएच १७, सी.६०८५) ने जोराची धडक दिली. यात भगत पुढच्या चाकाखाली चिरडला गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर चालक घटनास्थळावरून ट्रकसह फरार झाला होता. अपघाताची माहिती मिळताच चंदनझिरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविला. नंतर पाठलाग करून ट्रक चालकास गजाआड केले. या प्रकरणी मृताचा भाऊ राजकुमार बृजबिहारी भगत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक संशयित एकनाथ अशोक जऱ्हाड (रा. शिंगणापूर, जि.अहमदनगर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक फोके करीत आहेत.