मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे निघालेल्या दुचाकीवरील महिलेला जीपने चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 16:10 IST2025-03-08T16:10:02+5:302025-03-08T16:10:58+5:30
भोकरदन ते सिल्लोड रस्त्यावरील बुलढाणा अर्बन बँक समोर अपघात

मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे निघालेल्या दुचाकीवरील महिलेला जीपने चिरडले
भोकरदन ( जालना) : शहरातील जैन मंदिरातून दर्शन घेऊन दुचाकीवरून घरी परत जात असलेल्या महिलेला बुलढाणा अर्बन बँकेसमोर भरधाव जीपने ( एमएच २० ६९५१ ) चिरडल्याची घटना शुक्रवारी ( दि. ७) रात्री ८ वाजेच्या दरम्यान घडली. यात महिलेचा उपचारास नेत असताना मृत्यू झाला. दिपाली महेंद्र बाकलीवाल ( ४६ ) असे मृत महिलेचे नाव आहे.
दिपाली महेंद्र बाकलीवाल या शुक्रवारी रात्री येथील जैन मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. रात्री ८ वाजेच्यानंतर त्या मंदिरातून घराकडे दुचाकीवरून निघाल्या. रस्त्यातील बुलढाणा अर्बन बँकेच्या समोर त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगातील जीपने पाठीमागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दिपाली बाकलीवाल यांना जीपने काही अंतरावर फरफटत नेले. यात दिपाली बाकलीवाल या गंभीर जखमी झाल्या. नागरिकांनी लागलीच त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी सिल्लोडकडे घेऊन जात असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. दरम्यान, दिपाली बाकलीवाल यांच्यावर दुपारी १ वाजता भोकरदन येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात, आई-वडील, सासू-सासरे, पती, दोन मुले असा परिवार आहे.
जीप चालक दारूच्या नशेत
अपघात घडल्यावर देखील चालकाने महिलेला फरफटत नेले. भरधाव वेगतील या जीपचा चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. अपघातानंतर चालक फरार झाला असून जीप पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब सहाणे, गवळी यांनी पंचनामा. भोकरदन पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.