भरधाव पिकअपची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
By दिपक ढोले | Updated: November 1, 2022 15:53 IST2022-11-01T15:52:43+5:302022-11-01T15:53:17+5:30
जखमीवर जालना येथे उपचार सुरु आहेत.

भरधाव पिकअपची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
अंबड (जालना) : भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याची घटना अंबड तालुक्यातील पांगरखेड्याजवळ सोमवारी रात्री घडली. यात ज्ञानेश्वर नामदेव सावंत (३३, रा. बनगाव) हे जागीच ठार झाले, तर दीपक उत्तमराव कोळेकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत.
मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर सावंत व दीपक कोळेकर हे अंबडहून दुचाकी (क्र. एम.एच.२१.बी.डब्ल्यू १०२४)ने बनगाव येथे जात होते. पांगरखेड्याजवळ आल्यावर घनसावंगीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो पिकअप (क्र. एम.एच.२०.ई.एल.९७२२)ने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात ज्ञानेश्वर नामदेव सावंत हे जागीच ठार झाले, तर पाठीमागे असणारे दीपक कोळेकर हे दूरपर्यंत फरफरट गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर पाण्याच्या हौदाला धडक बसून, बोलेरो पिकअपदेखील उलटली. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा तपास ढाकणे करीत असल्याची माहिती ठाणे अंमलदार मोरे यांनी दिली. याप्रकरणी शिवाजी सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.