कार दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूवरील मोपेडवर धडकली; वकीलासह पत्नीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 18:53 IST2024-07-08T18:53:01+5:302024-07-08T18:53:44+5:30
कारच्या धडकेत मोपेडवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू; धुळे-सोलापूर महामार्गावरील माळीवाड्या जवळील घटना

कार दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूवरील मोपेडवर धडकली; वकीलासह पत्नीचा मृत्यू
वडीगोद्री / अंबड : भरधाव कारने दुभाजक ओलांडून स्कूटीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवरील माळीवाडा टोलनाक्याजवळ घडली.
छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा न्यायालयात वकिली करणारे ॲड. सतीश शाहूजी मगरे (वय ३२) व त्यांच्या पत्नी तेजल सतीश मगरे (वय ३०) रा. महाकाळा, ता. अंबड, जि. जालना हे दोघे स्कूटीने (२१ बी एन ९९२३) रविवारी अंबड येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरकडे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास येत होते. यावेळी छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जाणाऱ्या भरधाव कार (एमएच ४४ एस ९५६०) चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील दुभाजक ओलांडून महामार्गाच्या दुसऱ्या बाजूने जात असलेल्या स्कूटीस जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, स्कूटीवरील दाम्पत्य महामार्गाच्या नालीत कारसह जाऊन पडले. कारखाली दबून ॲड. सतीश मगरे व तेजल मगरे या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना घडताच कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच तत्काळ घटनास्थळी ते दाखल झाले. टोलनाका रुग्णवाहिकेने सतीश मगरे व तेजल मगरे यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी तपासून दोघांना मयत घोषित केले. या घटनेची नोंद अंबड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.