३० लाखांत खवले मांजर विक्रीसाठी आले अन् सहा तस्कर वनविभागाच्या सापळ्यात अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:08 IST2025-03-11T17:07:04+5:302025-03-11T17:08:46+5:30
वाशिम जिल्ह्यातील एकाकडे खवले मांजर असून, तो त्याची तस्करी करणार असल्याची माहिती जालन्याचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळाली होती.

३० लाखांत खवले मांजर विक्रीसाठी आले अन् सहा तस्कर वनविभागाच्या सापळ्यात अडकले
जालना : ३० लाख रुपयांत खवले मांजर विक्री करण्यासाठी जालन्यात आलेल्या वाशिम, हिंगोली, जालन्यातील सहा जणांना वनविभागाने शुक्रवारी ७ मार्च रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून खवल्या मांजरासह तीन कार जप्त करण्यात आल्या.
वाशिम जिल्ह्यातील एकाकडे खवले मांजर असून, तो त्याची तस्करी करणार असल्याची माहिती जालन्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे यांना मिळाली होती. नागरगोजे यांनी डमी ग्राहक होऊन त्या व्यक्तीशी संपर्क साधला. तसेच ३० लाखांत खवले मांजर खरेदीची तयारी दर्शविली. ३० लाखांत खवले मांजर विक्री होत असल्याने पाच जण शुक्रवार दि. ७ मार्च रोजी दोन कारमधून (क्र. एमएच ३७- एडी ९६०७ व एमएच ४३- बीपी ४५६८) जालना शहरातील मंठा चौफुली भागात आले. कारमध्ये खवले मांजर असल्याची खात्री होताच नागरगोजे यांनी आपल्या सहकाऱ्यांना इशारा केला. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने त्या पाच जणांसह खवले मांजर, एक कार जप्त केली. या प्रकरणात वाशिम जिल्ह्यातील पाच जणांविरोधात वनविभागाच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर आणखी एक कार (क्र. एमएच १४- बीएक्स ८७३७) आणि सहाव्या आरोपीस ताब्यात घेण्यात आले.
हे आहेत सहा आरोपी
वनविभागाने ताब्यात घेतलेल्यांमध्ये संजय उकंडा राठोड (रा. गिरोली, ता. जि. वाशिम), सुनील नामदेव थोरात (रा. चौंडी, ता. वसमत, जि. हिंगोली), नारायण पूजाराम अवचार (रा. विडोळी, ता. मंठा, जि. जालना), प्रताप गुलाबराव सरनाईक (रा. हिवरा, ता. रिसोड), अनिल अशोक साळवे (रा. ढोरखेडा, ता. मालेगाव, जि. वाशिम) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चौकशीनंतर एकनाथ अनिल इंगळे (रा. लाखला, ता. जि. वाशिम) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक सु. न. मुंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी के. डी. नागरगोजे, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एम. दौंड, वनपरिमंडळ अधिकारी आर. डी. दुनगहू, वाय. एम. डोमळे, वनपाल व्ही. पी. अवचार, बी. एम. पाटील, के. जी. शिंगणे, मुटके, के. जी. कदम, के. बी. वाकोदकर, डी. व्ही. पवार, जे. टी. नागरगोजे, वनरक्षक बालाजी घुगे, महादेव कळमकर, सुदाम राठोड आदींनी कारवाई केली.
खवले मांजर नैसर्गिक अधिवासात
आरोपींना १० मार्चपर्यंत एफसीआर मंजूर करण्यात आला. तर न्यायालयाच्या आदेशानुसार खवले मांजर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे यांनी सांगितले.