अग्निशमनच्या जवानांवरच आपत्ती; निजामकालीन कार्यालयाचे छत कोसळल्याने कर्मचारी जखमी
By विजय मुंडे | Updated: July 23, 2024 18:28 IST2024-07-23T18:26:30+5:302024-07-23T18:28:00+5:30
जालना महापालिकेअंतर्गत असलेल्या अग्निशमन विभागाचे कामकाज गत अनेक वर्षांपासून निजामकालीन इमारतीत सुरू आहे.

अग्निशमनच्या जवानांवरच आपत्ती; निजामकालीन कार्यालयाचे छत कोसळल्याने कर्मचारी जखमी
जालना : आपत्ती व्यवस्थापनामध्ये मदतकार्यास धावून जाणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांवरच मंगळवारी २३ जुलै रोजी सकाळी जीवघेणी आपत्ती ओढवली ! निजामकालीन धोकादायक इमारतीचे छत कोसळल्याने आतमध्ये काम करणारा एक कर्मचारी जखमी झाला. तर सुदैवाने इमारतीबाहेर असलेले सहा ते सात कर्मचारी बचावले. दैनंदिन काम करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना पर्यायी व्यवस्था नाही. त्यात नवीन इमारतीतील अनेक कामे रखडल्याने कार्यालय स्थलांतरित झालेले नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जीवाशी होणाऱ्या खेळास जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
जालना महापालिकेअंतर्गत असलेल्या अग्निशमन विभागाचे कामकाज गत अनेक वर्षांपासून निजामकालीन इमारतीत सुरू आहे. विशेषत: मागील चार-पाच वर्षांपासून या इमारतीची अवस्था खूपच बिकट झाली आहे. इथं धड बसण्यासाठी जागा व्यवस्थित नाही. पिण्याचे पाणी घरून आणावे लागते आणि शौचालयाचा तर पत्ताच नाही. अशा स्थितीतही या विभागात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामकाज करावे लागत होते.
अग्निशमन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले होते. सततच्या पाठपुराव्यानंतर २०२२-२३ मध्ये इमारतीसाठी एक कोटी ८० लाखांचा निधी मंजूर झाला; परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात मार्च-२०२४ मध्ये झाली; परंतु हे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. अशातच मंगळवारी सकाळी अचानक अग्निशमनचे कर्मचारी काम करीत असलेल्या निजामकालीन इमारतीचे छत कोसळले आणि त्यात चालक रवी देवानंद तायडे हे जखमी झाले. तर पंजाबराव देशमुख, विनायक चव्हाण, सादेक अली, नागेश घुगे, नितेश ढाकणे, अशोक गाडे, संदीप दराडे हे इमारतीबाहेर असल्याने बचावले. त्यांनी तातडीने तायडे यांना खासगी रुग्णालयात नेऊन उपचार केले. या घटनेमुळे शहरात मात्र एकच खळबळ उडाली आहे.