प्रशांत कोरटकर याच्यावर जालन्यातही गुन्हा दाखल, महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 19:50 IST2025-03-03T19:49:52+5:302025-03-03T19:50:40+5:30
सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पोलिसांना निवेदन

प्रशांत कोरटकर याच्यावर जालन्यातही गुन्हा दाखल, महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले
जालना : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नागपूरचा कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्याविरुद्ध शनिवारी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोरटकरविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमींनी निवेदनाद्वारे केली होती.
कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल करुन व इन्स्टाग्रामवरून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व माँसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल अतिशय हिणकस व गलिच्छ वक्तव्ये करून बदनामी केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांच्याबद्दलच्या अत्यंत विकृत लिखाणाचे समर्थन करून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकीची ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग इंद्रजीत सावंत यांच्या वॉलवर उपलब्ध आहे. यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कोरटकर याच्याविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी करावी, अशी मागणी सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली होती. निवेदनावरून प्रशांत कोरटकरविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
निवेदनावर डॉ. संजय लाखे पाटील, अरविंद देशमुख, विष्णू पाचफुले, अशोक पडूळ, भरत मानकर, संभाजी देशमुख, राजेंद्र गोरे, काकासाहेब खरात, मंगेश चव्हाण, सुभाष कोळकर, ज्ञानेश्वर कदम, शरद देशमुख, यु. डी. देशमुख, गणेश उबाळे, लक्ष्मण गाडेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.