जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात कार कोसळलील; व्यापाऱ्याचा बुडून मृत्यू
By दिपक ढोले | Updated: April 10, 2023 17:59 IST2023-04-10T17:59:11+5:302023-04-10T17:59:25+5:30
खापरदेव हिवरा ते एकलहरा रोडने तीर्थपुरी येथे येत असताना झाला अपघात

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात कार कोसळलील; व्यापाऱ्याचा बुडून मृत्यू
जालना : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात कार पडून व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना खापरदेव हिवरा ते एकलहरा रस्त्यावरील अचानक नगरजवळील पुलाजवळ सोमवारी सकाळी ११ वाजता घडली. नंदू सोनाजी राजगुरू (३८) असे मयत व्यापाऱ्याचे नाव आहे.
रुई येथीत रहिवासी असलेले नंदू राजगुरू यांचे तीर्थपुरी येथील मार्केट कमिटीच्या आवारात भुसार धान्य खरेदीचे दुकान आहे. ते सोमवारी सकाळी रुई येथून मित्राच्या शिफ्ट डिझायर कार (क्रमांक एमएच.१२.केएन.२२१७)ने तीर्थपुरीकडे निघाले होते. तीर्थपुरी येथे रस्ता रोको आंदोलन सुरू असल्यामुळे नंदू राजगुरू हे खापरदेव हिवरा ते एकलहरा रोडने तीर्थपुरी येथे येत होते. तीर्थपुरी येथील अचानक नगरवरील पुलाजवळ आल्यानंतर तोल जाऊन कार डाव्या कालव्यात पडली. कार पाण्यात बुडाल्याने नंदू राजगुरू यांचा मृत्यू झाला. माहिती कळताच, पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलिसांनी पंचनामा केला असून, पुढील तपास माळी हे करीत आहे.
देवाण-घेवाणीवरून झाले होते वाद
काही महिन्यांपूर्वी नंदू राजगुरू यांचे देवाणघेवाणीवरून काही व्यापाऱ्यांबरोबर वाद झाले होते. त्याबाबत नंदू राजगुरू यांच्या पत्नीने पोलिसात तक्रारही दिली होती. त्यांचा भुसार माल खरेदीचा व्यवसाय असून, अनेक शेतकऱ्यांकडून त्यांनी माल खरेदी केलेला आहे. नंदू राजगुरू यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.