पुलाची वाळू अंगावर, ५ जणांचा झोपेतच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 06:19 IST2025-02-23T06:19:36+5:302025-02-23T06:19:53+5:30
जालना जिल्ह्यातील घटना : टिप्परमधील वाळू शेडवर टाकल्याने झाला घात

पुलाची वाळू अंगावर, ५ जणांचा झोपेतच मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद (जि. जालना) : टिप्परचालकाने शेडवर वाळू टाकल्याने पत्रा तुटून आतमध्ये झोपलेल्या पाच बांधकाम मजुरांच्या अंगावर वाळू पडली आणि त्यांचा वाळूखाली दबल्याने गुदमरून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास पासोडी (ता. जाफराबाद) येथे घडली.
गणेश काशीनाथ धनवई (५०), भूषण गणेश धनवई (१५, दोघे रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर), राजेंद्र दगडूबा वाघ (४२, रा. दहिद, ता. जि. बुलढाणा), सुनील समाधान सपकाळ (२० रा. पद्मावती, ता. भोकरदन), सुपडू मधूकर आहेर (वय-३८ रा. तोंडापूर, ता. जामनेर जि. जळगाव) अशी मृतांची नावे आहेत. टिप्परचालक संतोष शेषराव कोल्हे (रा. जाफराबाद) व टिप्परमालक गोपाल गवळी (रा. खापरखेडा) यांना जाफराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पासोडी शिवारात भारज-पासोडी मार्गावरील चांडोळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. येथे ही दुर्घटना घडली.
बांधकामाच्या शेजारीच बांधले मजुरांसाठी शेड
बांधकामाच्या शेजारी मजुरांना राहण्यासाठी पत्र्याचे शेड बांधण्यात आले होते. रस्त्याच्या कामासाठी लागणारी वाळू घेऊन आलेल्या टिप्परचालकाने शेडवरच वाळू टाकल्याने ही घटना घडली. दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांना वाळूच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आणि पार्थिव जाफराबादेतील ग्रामीण रुग्णालयात नेले.
बाप-लेकाचा झाला मृत्यू,
माय-लेकी बचावल्या
गणेश धनवई बांधकामासाठी सिल्लोड तालुक्यातून आले होते. पत्नी संगीता या मुलगा भूषण व मुलगी धनश्रीला घेऊन पतीला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्या पहाटे अंघोळीला पाणी तापवण्यासाठी उठल्या. तेव्हाच ही घटना घडली. त्यांनी मुलीस बाहेर काढले. मात्र बापलेकाचा मृत्यू झाला. नवव्या वर्गातील भूषण सुट्टी असल्याने वडिलांना भेटण्यासाठी आला होता.