जालना अनुदान वाटप घोटाळ्यात आणखी ७ तलाठ्यांसह ४ सहायक महसूल कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:17 IST2025-06-20T12:03:44+5:302025-06-20T12:17:13+5:30

३५ कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशीसाठी शिफारस, तहसीलदार व नायब तहसीलदारांचा अहवाल शासनास सादर

4 assistant revenue officials, including 7 more Talathis, suspended in Jalna grant allocation scam | जालना अनुदान वाटप घोटाळ्यात आणखी ७ तलाठ्यांसह ४ सहायक महसूल कर्मचारी निलंबित

जालना अनुदान वाटप घोटाळ्यात आणखी ७ तलाठ्यांसह ४ सहायक महसूल कर्मचारी निलंबित

जालना : शेतकरी अनुदान वाटप घोटाळा उघड झाल्यानंतर ८९ कर्मचारी चौकशीत दोषी आढळले आहेत. यात तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांचा समावेश असल्याचे उघड झाले होते. मागील आठवड्यात प्रशासनाने १० तलाठ्यांचे निलंबन केले होते. गुरुवारी पुन्हा ७ तलाठी, ४ सहायक महसूल कर्मचारी अशा ११ कर्मचाऱ्यांचे निलंबन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. यामुळे निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २१ झाली आहे. तसेच ३५ तलाठ्यांची विभागीय चौकशी सुरू झालेली आहे. ५ तहसीलदार व ६ नायब तहसीलदारांवर कारवाई करण्याचा अहवाल शासनास सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात बनावट शेतकरी दाखवून, तसेच जमीन नसताना आणि एकाच नावावर दोनदा अनुदान लाटल्याचा प्रकार समोर आला होता. जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत अतिवृष्टी आणि गारपिटीच्या शेतकऱ्यांसाठी मंजूर अनुदानात सुमारे ४२ कोटींचा अपहार केल्याप्रकरणी यापूर्वी १० तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

समितीच्या अहवालात दोषी आढळलेल्या तलाठ्यांना लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते, ज्यात समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मागील आठवड्यात १० तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान, चौकशी समितीकडून इतर खुलासे तपासण्यात येत आहेत. यानंतर गुरुवारी पुन्हा ७ तलाठी व ४ सहायक महसूल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईने गैरप्रकार करणाऱ्या इतरांचेही धाबे दणाणले आहेत.

आजी-माजी तहसीलदारांना नोटीस
घोटाळाप्रकरणी अंबड व घनसावंगी तालुक्यातील आजी-माजी पाच तहसीलदार व सहा नायब तहसीलदारांना नोटीस बजावण्यात आलेली होती. अधिकाऱ्यांचे खुलासे प्रशासनास सादर केलेले आहेत. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी अहवाल प्रशासनाकडून शासनास सादर करण्यात आला असून अधिकाऱ्यांवर शासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

विभागीय चौकशीनंतर गुन्हे दाखल होणार
घोटाळ्याच्या चौकशीत दोषी आढळून आलेल्या ३५ तलाठ्यांची विभागीय चौकशी करण्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. विभागीय चौकशीनंतर या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

‘या’ कर्मचाऱ्यांचा समावेश
गुरुवारी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सो.पिंपळगाव येथे सध्या कार्यरत असलेले तलाठी डी.जी. कुरेवाड, डोमगावचे येथील तलाठी सचिन बागूल, तीर्थपुरीचे तलाठी राजू शेख, बाजी उम्रदचे तलाठी एस.एस. कुलकर्णी, बोधलापुरीचे तलाठी एस.एम. जारवाल, मूर्तीचे तलाठी डी.जी.चांदमारे, कुंभाझरीच्या मंडळ अधिकारी ज्योती खर्जुले यांच्यासह मंठा तहसील कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी आर.बी. माळी, घनसावंगी तहसील कार्यालयात कार्यरत असलेले सहायक महसूल अधिकारी आशिष पैठणकर, अंबड तहसील कार्यालयातील सहा.महसूल अधिकारी सुशील जाधव, घनसावंगी तहसील कार्यालयातील व्ही.डी.ससाने यांचा समावेश आहे.

अहवाल शासनास सादर
मागील आठवड्यात १० तलाठ्यांना निलंबित केल्यानंतर आज पुन्हा ७ तलाठी व ४ सहायक महसूल अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे. तसेच ३५ तलाठ्यांची विभागीय चौकशीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. घोटाळ्यात दोषी आढळलेले तहसीलदार व नायब तहसीलदारांवर कारवाई करण्याचा अहवाल शासनास सादर करण्यात आलेला आहे.
- डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, जालना.

Web Title: 4 assistant revenue officials, including 7 more Talathis, suspended in Jalna grant allocation scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.