लोकल रेल्वे बंद असल्याने मुंबईकरांच्या सेवेत मराठवाड्यातील ३२५ बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 19:11 IST2021-01-21T19:08:50+5:302021-01-21T19:11:18+5:30
बेस्ट प्रशासनाने मराठवाड्यातील ३५० बसेस मुंबईत चालविण्यासाठी प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत.

लोकल रेल्वे बंद असल्याने मुंबईकरांच्या सेवेत मराठवाड्यातील ३२५ बसेस
- विकास व्होरकटे
जालना : कोरोनामुळे बंद असलेली मुंबईतील लोकल रेल्वेसेवा अद्याप पूर्ववत झालेली नाही. यातच व्यवसायासह नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना सेवा देणाऱ्या बेस्ट बसेस कमी पडत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासनाने मराठवाड्यातील ३५० बसेस मुंबईत चालविण्यासाठी प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत. याला दीड महिन्याहून अधिक कालावधी झाला आहे.
मुंबईत आजही नोकरदारांसह व्यवसाय करणाऱ्यांची संख्या कमी नाही. तेथे घराबाहेर पडताना दुचाकीला प्राधान्य दिले जात नसून, लोकल रेल्वेला अधिकची पसंती दिली जाते. असे असतानाच कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद झालेली मुंबईतील लोकल रेल्वे अद्याप पूर्व पदावर आलेली नाही. यातच शासनस्तरावरून कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या अटी हळूहळू शिथिल केल्या जात आहेत. त्यामुळे मुंबईत घराबाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. याचा परिणाम बेस्ट बसेसवर होत आहे. ही बाब ओळखून मुंबईतील बेस्ट प्रशासनाने मराठवाड्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ३५० बसेस प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत. या बसेस मुंबईतील लोकल रेल्वे सुरू होईपर्यंत ठेवल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वाहक-चालकांची तपासणी
मुंबईत बेस्टद्वारे चालविण्यात येत असलेल्या रा. प.च्या बसेसवर प्रत्येक विभागातून १५ दिवसाला नव्याने चालक- वाहक पाठविले जातात. कोरोनामुळे मुंबईत सेवा बजावून गावाकडे येणाऱ्या चालक- वाहकांची तेथेच कोरोना तपासणी केली जाते. यात कुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यावर तेथेच उपचार केले जातात.
विभागनिहाय बसेस :
नांदेड ५०
परभणी ५०
औरंगाबाद ५०
बीड ५०
उस्मानाबाद ५०
जालना २५
लातूर ५०