तलवारीसह फिरणारे दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:48 IST2018-09-21T00:48:38+5:302018-09-21T00:48:52+5:30
राजूर -भोकरदन रस्त्यावर बोलेरो गाडीत तलवार व जंबिया घेऊन फिरणाऱ्या दोघांना चंदनझिरा पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे

तलवारीसह फिरणारे दोघे ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील राजूर -भोकरदन रस्त्यावर बोलेरो गाडीत तलवार व जंबिया घेऊन फिरणाऱ्या दोघांना चंदनझिरा पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. शिवाजी दामोधर कातुरे व सुधाकर मच्छिंद्र कातुरे (दोघे रा. दगडवाडी ता. जि. जालना) अशी त्यांची नावे आहेत.
राजूर - भोकरदन रस्त्यावर रात्री १० वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना हवालदार रामदास शिलवंत यांना माहिती मिळाली की, भोकरदन जालना रस्त्यावरील दगडवाडी फाट्या जवळ एका चारचाकी गाडीमध्ये घातक हत्यारे आहेत. यानंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी कर्मचाºयांसह त्या गाडीला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, बोलेरो चालकाने गाडी सुसाट वेगाने जालन्याकडे पळविली. त्यांनतर पोलीसांनी गाडीचा पाठलाग करुन गाडीची झडती घेतली असता, गाडीमध्ये एक तलवार, एक जंबिया मिळाला. शिवाजी कातुरे, सुधाकर कातुरे यांना ताब्यात घेऊन गाडीसह ५ लाख ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. बाळासाहेब पवार व त्यांच्या सहका-यांनी केली.
जालना : शहर व परिसरातून एकूण २० तलवारी जप्त
गेल्या काही महिन्यांमध्ये चोरी, दरोडे आणि गुंडगिरी वाढली होती. यामुळे शहरात पोलिसांचा वचक कमी झाला आहे की काय, अशी चर्चा होती. परंतु गेल्या आठवडाभरापासून पोलिसांनी कडक कारवाई करत शस्त्र लपवून ठेवलेल्या घरामध्ये छापा टाकून ती जप्त केली. त्यामुळे पोलिसांचा दरारा निर्माण झाला आहे.