'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:26 IST2026-01-02T12:24:34+5:302026-01-02T12:26:16+5:30
Zohran Mamdani Letter To Umar Khalid: दिल्ली दंगलीप्रकरणी उमर खालिद 2020 पासून तिहार तुरुंगात कैद आहे.

'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र
Zohran Mamdani Letter To Umar Khalid: न्यूयॉर्क शहराचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांनी जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता आणि दिल्ली दंगल प्रकरणात तुरुंगात असलेल्या उमर खालिदला एक भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रात ममदानी यांनी “आम्ही सर्व तुझ्याबद्दल विचार करत आहोत” असे नमूद केले आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी (01 जानेवारी 2026) ममदानी यांनी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाची शपथ घेतल्यानंतर हे पत्र चर्चेत आले आहे.
काही दिवसांपूर्वी उमर खालिद याचे वडील कासीम इलियास यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय व्यक्तींशी भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर ममदानी यांनी हे पत्र लिहिल्याचे मानले जात आहे.
ममदानी यांनी पत्रात काय लिहिले?
ममदानी यांनी पत्रात लिहिले, “प्रिय उमर, कटुता स्वतःवर हावी होऊ देऊ नये, या तुझ्या शब्दांची मला नेहमी आठवण येते. तुझ्या आई-वडिलांना भेटून आनंद झाला. आम्ही सर्वजण तुझ्याबद्दल विचार करत आहोत.” ममदानींच्या या शब्दांतून उमर खालिदप्रती असलेली सहानुभूती आणि पाठिंबा स्पष्टपणे दिसून येतो.

यापूर्वीही पाठिंबा व्यक्त
ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा जोहरान ममदानी यांनी उमर खालिदला पाठिंबा दिला आहे. 2023 मध्ये न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ममदानी यांनी उमर खालिदने तुरुंगातून लिहिलेले पत्र सार्वजनिकरित्या वाचून दाखवले होते. त्यावेळी त्यांनी उमर खालिदचे वर्णन द्वेष आणि लिंचिंगविरोधात आवाज उठवणारा असे केले होते.
उमर खालिद तिहार तुरुंगात कैद
उमर खालिद सध्या तिहार तुरुंगात कैद आहे. 2020 मध्ये झालेल्या दिल्ली दंगलीनंतर त्याला अटक करण्यात आली होती. अलीकडेच कडाकडडूमा न्यायालयाने उमरला बहिणीच्या लग्नासाठी 14 दिवसांची अंतरिम जामीन मंजूर केला होता. ही जामीन 16 ते 29 डिसेंबरदरम्यान होती. त्याच्यावर कट रचणे, दंगल, बेकायदेशीर जमाव तसेच UAPA (बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गंभीर आरोप दाखल आहेत. या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे.