"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 11:03 IST2025-09-09T09:33:39+5:302025-09-09T11:03:03+5:30
United State News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या एका डिनर पार्टीमध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये वादावादी होऊन प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे.

"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या एका डिनर पार्टीमध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये वादावादी होऊन प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. यावेळी ‘तू बाहेर चल तुझं तोंडच फोडतो’, अशी धमकी एका अधिकाऱ्याने दुसऱ्या अधिकाऱ्याला दिली. ही घटना वॉशिंग्टन डीसीमधीली एका विशेष क्लब एक्झिक्युटिव्ह ब्रँचचं उदघाटन आणि एक पॉडकास्ट होस्ट चमथ पालिहपितिया यांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमावेळी घडली. सेक्रेटरी ऑफ फायनान्स म्हणजेच अमेरिकेचे वित्तमंत्री स्कॉट बेसेन्ट आणि फेडरल हौसिंग फायनान्स एजन्सीचे डायरेक्टर बिल पुल्टे यांच्यात ही वादावादी झाली.
एक्झिक्युटिव्ह क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीवेळी स्कॉट बेसेन्ट यांनी पुल्टे यांच्या तोंडावर बुक्का मारण्याची धमकी दिली. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिल पुल्टे हे ट्रम्प यांच्यासमोर आपल्या कागाळ्या करतात, अशी कुणकूण बेसेंट यांना लागली होती. त्यामुळे स्कॉट बेसेन्ट यांच्या संताप अनावर झाला. त्यांनी बिल पुल्टे यांच्या तोंडावर ठोसा मारण्याची धमकी दिली.
ही घटना ४ सप्टेंबर २०२५ रोजी वॉशिंग्टन डीसीमध्ये एका खाजगी डिनर पार्टीदरम्यान, घडली. या डिनर पार्टीसाठी ट्रान्सपोर्टेशन सेक्रेटरी सीन डफी, कॉमर्स सेक्रेटरी हावर्ड लुटनिक, इंटीरियर सेक्रेटरी डग बर्गम आणि नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टर तुलसी गबार्ड आदी महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या.
दरम्यान, कॉकटेल पार्टीतील गोंधळावेळी बेसेन्ट यांनी पुल्टे यांना शिविगाळ करत टिप्पणी केली. तुम्ही राष्ट्राध्यक्षांना माझ्याबाबत काय सांगत आहात. तुम्ही खड्ड्यात जा. मी तुमच्या तोंडावर ठोसा मारेन, अशी धमकी बेसेन्ट यांनी पुल्टे यांना दिली. बेसेन्ट यांचा तो आवेश पाहून पुल्टे अवाक् झाले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या तमावपूर्ण वातावरणात क्लबचे सहमालक आणि फायनान्सर ओमीद मलिक यांना मध्ये पडून हस्तक्षेप करावा लागला. मात्र बेसेन्ट यांना हे अमान्य होते. त्यांना पुल्टे यांना बारमधून बाहेर काढायचे होते. दरम्यान, या घटनेनंतर रविवारी बेसेन्ट हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकन ओपनचा अंतिम सामना पाहण्यासाठी आले होते. मात्र यावेळी त्यांना राष्ट्राध्यक्षांच्या आसनापासून दूर बसवण्यात आले होते.