Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 01:49 IST2025-05-09T01:48:51+5:302025-05-09T01:49:04+5:30
Robert Prevost New Pope: बुधवारी चिमनीमध्ये आग पेटविण्यात आली होती. यावेळी काळा धूर बाहेर पडत होता. यामुळे आज दुसऱ्या दिवशी पुन्हा आग पेटविण्यात आली. यावेळी पांढरा धूर बाहेर येऊ लागला.

Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
व्हॅटिकन सिटीमधील सिस्टिन चॅपलच्या चिमणीतून आज पांढरा धूर बाहेर पडला, यामुळे परंपरेनुसार नव्या पोपची निवड जाहीर करण्यात आली. अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट हे कॅथोलिक चर्चचे नवे पोप असतील आणि त्यांना पोप लिओ चौदावा म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये वरिष्ठ कार्डिनल्सनी केली.
बुधवारी चिमनीमध्ये आग पेटविण्यात आली होती. यावेळी काळा धूर बाहेर पडत होता. यामुळे आज दुसऱ्या दिवशी पुन्हा आग पेटविण्यात आली. यावेळी पांढरा धूर बाहेर येऊ लागला. यानंतर सुमारे ७० मिनिटांनी पोप लिओ सेंट पीटर बॅसिलिकाच्या मध्यवर्ती बाल्कनीत दिसले. १३३ कार्डिनल इलेक्टर्सनी कॅथोलिक चर्चसाठी एक नवीन नेता निवडल्याचे स्पष्ट झाले. फ्रान्सचे कार्डिनल डोमिनिक मॅम्बर्टी यांनी नवीन पोप म्हणून रॉबर्ट प्रीव्होस्ट यांचे नाव जाहीर केले.
प्रीव्होस्ट हे ६९ वर्षांचे आहेत. ते मूळचे शिकागोचे आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीचा बराच काळ हा पेरूमध्ये मिशनरी म्हणून घालवला आणि २०२३ मध्येच ते कार्डिनल बनले. पोप फ्रान्सिसच्या निधनानंतर, लिओ २६७ वे कॅथोलिक पोप बनले आहेत. पोप फ्रान्सिस यानी १२ वर्षे कॅथोलिक चर्चचे नेतृत्व केले होते.
कशी आहे प्रक्रिया...
पोप कॉन्क्लेव्हमध्ये नवीन पोपची निवड केली जाते. जगभरातील कार्डिनल्स पोपची निवड करतात. नवीन पोपसाठी मतदान व्हॅटिकन सिटीमधील सिस्टिन चॅपलमध्ये होते. ८० वर्षांपेक्षा कमी वयाच्या कार्डिनल्सना मतदानाचा अधिकार आहे. मतदान आणि बैठकीची संपूर्ण प्रक्रिया गुप्त ठेवली जाते. या काळात, कार्डिनल्सना बाहेरील जगाशी कोणताही संपर्क साधण्याची परवानगी नसते.जर कोणत्याही उमेदवाराला आवश्यक दोन तृतीयांश मते मिळाली नाहीत तर मतपत्रिका चुलीत जाळली जाते. या मतपत्रिका जाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे अत्यंत काळा धूर निघतो. जेव्हा एखाद्या उमेदवाराला एका फेरीत आवश्यक असलेल्या दोन तृतीयांश मते मिळतात तेव्हा शेवटच्या फेरीतील मतपत्रिका जाळल्या जातात पण यावेळी मतपत्रिका जाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमधून पांढरा धूर निघतो ज्यामुळे बाहेरील जगाला नवा पोप निवडला गेल्याचे कळते.