'होय, गलवान संघर्षात आमचे सैनिक मारले गेले', तब्बल ९४ दिवसांनी चीनने केले मान्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 06:06 IST2020-09-19T02:58:11+5:302020-09-19T06:06:13+5:30
40 वर्षांमध्ये पहिल्यांदाचभारत व चीनमध्ये गलवानच्या निमित्ताने भीषण संघर्ष झाला.

'होय, गलवान संघर्षात आमचे सैनिक मारले गेले', तब्बल ९४ दिवसांनी चीनने केले मान्य
बीजिंग : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारतीय जवानांबरोबर १५ जून रोजी झालेल्या संघर्षात चिनी सैनिक मारले गेले होते, अशी कबुली चीनने दिली आहे. मात्र, या संघर्षात ठार झालेल्या चिनी सैनिकांची संख्या भारतीय जवानांहून कमी आहे, असा दावा चीनने केला आहे.
एलएसीवर तणाव अजूनही कायम
40 वर्षांमध्ये पहिल्यांदाचभारत व चीनमध्ये गलवानच्या निमित्ताने भीषण संघर्ष झाला. चीनच्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी संसदेत सांगितले होते. गलवानच्या संघर्षानंतर भारत व चीनमधील तणावात आणखी वाढ झाली.
29 आॅगस्टच्या मध्यरात्रीनंतर चिनी सैनिकांनी पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागावर घुसखोरी करण्याचे केलेले प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडले होते.आधी चीनने पुढे सरकण्यास व सैन्य तैनातीस सुरुवात केली. त्यानंतर भारतही सरसावला आहे.
20 भारतीय जवान शहीद व काही सैनिक गलवान खोऱ्यातील संघर्षात जखमी झाले होते. या घटनेत चिनी लष्कराची मोठी हानी झाली असल्याचा दावा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केला होता.
चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राचे संपादक हू शीजिन यांनी राजनाथसिंह यांच्या वक्तव्याच्या प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण आपल्या टष्ट्वीटला जोडून म्हटले आहे की, ‘गलवानमधील संघर्षात भारतापेक्षा चीनचे कमी नुकसान झाले आहे, तसेच एकाही चिनी सैनिकाला भारताने ताब्यात घेतलेले नाही. उलट अनेक भारतीय सैनिकांना चिनी लष्कराने पकडले होते. चीनचे भारतापेक्षा जास्त नुकसान झाले, ही खोटी बातमी आहे.’