भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 12:38 IST2025-09-20T12:34:32+5:302025-09-20T12:38:41+5:30
Khawaja Asif: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सौदी अरेबियासोबतच्या नुकत्याच झालेल्या संरक्षण कराराबाबत एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.

भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सौदी अरेबियासोबतच्या नुकत्याच झालेल्या संरक्षण कराराबाबत एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास सौदी अरेबिया पाकिस्तानच्या बचावासाठी पुढे येईल, असा दावा त्यांनी केला आहे.
ख्वाजा आसिफ यांनी शुक्रवारी सांगितले की, "जर भारताने पाकिस्तानसोबत युद्ध केले तर, सौदी अरेबिया नक्कीच पाकिस्तानचे रक्षण करेल. यात कोणतीही शंका नाही." आसिफ यांनी हे देखील स्पष्ट केले की, गरजेच्या वेळी पाकिस्तानची अण्वस्त्रे सौदी अरेबियाला उपलब्ध असतील. पाकिस्तानच्या अधिकृत धोरणात असे म्हटले आहे की, ते फक्त भारताविरुद्धच वापरले जाऊ शकतात. मात्र, तरीही पाकिस्तान सौदी अरेबियाच्या मदतीला धावून जाईल.
ख्वाजा आसिफ यांनी हा करार बचावात्मक स्वरूपाचा असल्याचे सांगताना या कराराची तुलना नाटोच्या कलम ५ शी केली, ज्यात एका सदस्यावरील हल्ला हा सर्वांवरील हल्ला मानला जातो. पाकिस्तान किंवा सौदी अरेबियावर हल्ला झाल्यास आम्ही एकत्र लढू, असेही ते म्हणाले.
सौदी अरेबियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याला 'व्यापक संरक्षण करार' म्हटले आहे, ज्यात सर्व लष्करी साधनांचा समावेश आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या रियाध भेटीदरम्यान हा करार झाला. या करारात असे म्हटले आहे की, कोणत्याही एका देशावर झालेला हल्ला दोन्ही देशांवर झालेला हल्ला मानला जाईल. यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याला एक नवा आयाम मिळाला आहे.