इराणला कधीच अण्वस्त्रधारी देश बनू देणार नाही; ट्रम्प यांची धमकी, अमेरिका-इस्रायलनं युद्ध पुकारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 13:39 IST2026-02-28T13:36:03+5:302026-02-28T13:39:09+5:30
इराणमधील सुप्रीम लीडर खामेनेई यांच्या सैन्याने शस्त्र खाली टाकावे किंवा अमेरिकन हल्ल्याचा सामना करावा असं ट्रम्प यांनी इशारा दिला.

इराणला कधीच अण्वस्त्रधारी देश बनू देणार नाही; ट्रम्प यांची धमकी, अमेरिका-इस्रायलनं युद्ध पुकारलं
वॉश्गिंटन - इराण सातत्याने अण्वस्त्र कार्यक्रम हाती घेत आहे. लांब पल्ल्याच्या मिसाईल विकसित करत आहे. आम्ही इराणला कधीच अण्वस्त्रधारी देश बनू देणार नाही अशी धमकी देत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ला सुरू झाला आहे. या दोन्ही देशांनी इराणविरोधात युद्ध पुकारले असून एकाचवेळी ३० ठिकाणी टार्गेट हल्ला करण्यात आला. तेहरानमध्ये सायरन वाजू लागले आहेत. ही सैन्य कारवाई सुरूच राहील आणि आम्ही इराणची मिसाइल बनवण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट करू असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
इराणवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची पहिलीच प्रतिक्रिया समोर आली आहे. तेहरानला कधीही अण्वस्त्र शक्ती बनू दिले जाणार नाही असं ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराणमधील सुप्रीम लीडर खामेनेई यांच्या सैन्याने शस्त्र खाली टाकावे किंवा अमेरिकन हल्ल्याचा सामना करावा. इराणी सरकारकडून अमेरिकन नागरिकांना होणाऱ्या धोक्यातून त्यांचे संरक्षण करणे हा आमचा हेतू आहे. इराण कधीही न्यूक्लियर बॉम्ब बनवू शकत नाही. जे आमच्याकडे आहे ते इराणकडे कधी होऊ देणार नाही. या हल्ल्यात आमच्याही नागरिकांचे जीव जाऊ शकतात. युद्धात हे होत राहते परंतु हे आम्ही आतापुरते नाही तर भविष्याचा विचार करून करत आहोत. हे एक मिशन आहे असं ट्रम्प यांनी लोकांना संबोधित करताना सांगितले.
#WATCH | US President Donald Trump says, "... To the members of the Islamic Revolutionary Guard, the armed forces, and all of the police, I say tonight that you must lay down your weapons and have complete immunity, or, in the alternative, face certain death. So, lay down your… pic.twitter.com/2QejC7UT6J
— ANI (@ANI) February 28, 2026
इस्रायलने शनिवारी सकाळी इराणविरोधात सैन्य कारवाई सुरू केली आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये जोरदार स्फोटाचे आवाज ऐकायला येत आहेत. राजधानीत कमीत कमी ३ मोठे स्फोट झाले आहेत. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी या हल्ल्यांची पुष्टी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात बॅक डोअर चर्चा सुरू होती. जिनेव्हा येथे या दोन्ही देशात तिसऱ्या टप्प्यातील चर्चा सुरू होती. परंतु आता अमेरिका आणि इस्रायलच्या या हल्ल्यामुळे या चर्चांना ब्रेक लागला आहे.
इस्रायलमध्ये अलर्ट जारी
इराणवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने त्यांच्या देशातील नागरिकांना सतर्क राहण्याचा अलर्ट जारी केला आहे. सायरन वाजवून संभाव्य इराणी मिसाइलच्या हल्ल्याच्या ठिकाणी लोकांना सुरक्षितपणे दुसऱ्या स्थानावर नेले जात आहे. दुसरीकडे मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना भारताने दिल्या आहेत. या भागात हल्ल्याची तीव्रता पाहून भारतीय दूतावास कार्यालयाने नागरिकांना इस्रायली अधिकारी आणि पोलिसांनी दिलेल्या सुरक्षा सूचनेचे पालन करण्यास सांगितले आहे.