चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 19:44 IST2025-10-20T19:25:24+5:302025-10-20T19:44:47+5:30
अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या व्यापार संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान होऊ शकते असा इशारा जागतिक व्यापार संघटनेने दिला आहे.

चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
वॉश्गिंटन - जर चीन अमेरिकेच्या बाजूने काही सकारात्मक पाऊल उचलत असेल तर आमचं सरकारही टॅरिफ नितीवर फेरविचार करू शकते असे संकेत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने चीनहून आयात वस्तूंवर १०० टक्के टॅरिफची घोषणा केली होती. त्याशिवाय १ नोव्हेंबरपासून सॉफ्टवेअर निर्यात नियंत्रण लागू करण्याची घोषणा केली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांना सांगितले की, माझे आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यातील संबंध पूर्वीपेक्षा चांगले आहेत. दोन्ही देशांत मतभेद आहेत परंतु जर बीजिंगने अमेरिकेसाठी काही चांगले केले तर टॅरिफमध्ये कमी येऊ शकते. सध्या एकतर्फी मार्ग निघू शकत नाही. आम्ही आमच्या हितांचे रक्षण करू परंतु चीन सहकार्य करत असेल तर चर्चेतून तोडगा निघू शकतो असं त्यांनी सांगितले.
ट्रेड वॉरमुळे वाढला तणाव
मागील काही महिन्यांतील शांततेनंतर अमेरिका आणि चीन व्यापार युद्ध पुन्हा एकदा चिघळत असल्याचं दिसून येते. वॉश्गिंटनने अलीकडेच तंत्रज्ञान उत्पादन निर्यातीवर कठोर धोरण अवलंबलं आहे. अमेरिकेच्या बंदरांवर चिनी जहाजांवर अतिरिक्त शुल्क लावण्याची तयारी ट्रम्प प्रशासनाने केली आहे. त्याला उत्तर म्हणून चीनने रेअर अर्थ खजिने आणि इतर साहित्यांच्या निर्यातीवर कठोर नियम लागू केले आहेत.
नव्याने चर्चेची तयारी
अमेरिकन अर्थमंत्री स्कॉर्ट बेसेंट यांनी पुष्टी केली की, दोन्ही देशांचे प्रतिनिधी या आठवड्यात मलेशिया येथे पुन्हा नव्याने व्यापार चर्चा करतील. ही बैठक ट्रम्प यांच्या प्रतिक्रिया आणि शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीनंतर अमेरिका-चीन यांच्यातील संबंध सुधारण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. टॅरिफ वादातून नव्याने दोन्ही देश चर्चेला तयार असल्याचे संकेतही चीनने दिले आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेला धोका, WTO चा इशारा
जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) महासंचालक न्गोझी ओकोंजो-इवेला यांनी इशारा दिला आहे की, अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या व्यापार संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान होऊ शकते. जर हा तणाव कायम राहिला तर जागतिक उत्पादन अंदाजे ७% ने कमी होऊ शकते. अमेरिका-चीन व्यापार तणाव केवळ द्विपक्षीय नाही तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल असं त्यांनी सांगितले.
ट्रम्प यांची रणनीती काय?
ट्रम्प यांचे धोरण त्यांच्या "डील डिप्लोमसी" चा भाग आहे. ते प्रथम कठोर उपाययोजना करतात, नंतर राजकीय आणि तांत्रिक सवलती मिळविण्यासाठी वाटाघाटीचे दरवाजे उघडतात. ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणाचा परिणाम अमेरिकन तंत्रज्ञान क्षेत्रावर, विशेषतः सेमीकंडक्टर आणि सॉफ्टवेअर उद्योगांवर झाला आहे, जे चीनला एक प्रमुख बाजारपेठ मानतात असं तज्ज्ञांनी सांगितले आहे.