ट्रम्प यांचे हात निळे का पडले? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीचं गूढ वाढलं; खुद्द ट्रम्प यांनीच सांगितलं कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:41 IST2026-01-02T10:41:00+5:302026-01-02T10:41:30+5:30
ट्रम्प यांच्या उजव्या हाताच्या मागच्या बाजूला असलेले गडद निळे डाग अनेकदा कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

ट्रम्प यांचे हात निळे का पडले? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीचं गूढ वाढलं; खुद्द ट्रम्प यांनीच सांगितलं कारण!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांपासून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ट्रम्प यांच्या उजव्या हाताच्या मागच्या बाजूला असलेले गडद निळे डाग अनेकदा कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ७९ वर्षांचे ट्रम्प हे अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष असल्याने त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, आता ट्रम्प यांनी स्वतः समोर येत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला असून, हे डाग कोणत्याही गंभीर आजारामुळे नसून एका गोळीमुळे असल्याचे स्पष्ट केले आहे.
एस्पिरिन गोळीचा 'हा' परिणाम
'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी सांगितले की, ते दररोज रक्तातील गाठी रोखण्यासाठी आणि हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी 'एस्पिरिन' घेतात. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, ही औषधे रक्त पातळ करतात, ज्यामुळे हाताला थोडासा जरी धक्का लागला, तरी तिथे निळी खूण पडते. "मला माझ्या हृदयामध्ये जाड रक्त नकोय, तर पातळ आणि शुद्ध रक्त हवे आहे. त्यामुळेच मी ही औषधे घेतो," असे ट्रम्प यांनी आपल्या खास शैलीत सांगितले.
मेकअप आणि मलमपट्टीचा वापर
अनेकदा ट्रम्प यांचे हात मेकअप किंवा पट्ट्यांनी झाकलेले दिसतात. यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, "जेव्हा कधी माझ्या हाताला जोरात धक्का लागतो किंवा कोणी 'हाय-फाइव्ह' देते, तेव्हा तिथे निळी खूण पडते. अशा वेळी मी ती लपवण्यासाठी १० सेकंदात मेकअप लावतो." त्यांनी एका घटनेचा उल्लेख केला, जिथे अॅटर्नी जनरल पाम बाँडी यांच्या अंगठीचा धक्का लागल्याने त्यांच्या हातावर जखम झाली होती.
जाहीर कार्यक्रमात झोपल्याचा आरोप फेटाळला
ट्रम्प यांच्यावर दुसरा मोठा आरोप असा होता की, ओव्हल ऑफिसमधील बैठकीत किंवा सार्वजनिक कार्यक्रमांत त्यांचे डोळे मिटलेले दिसतात. यावर ट्रम्प यांनी 'स्लीपी जो'ची आठवण करून देत म्हटले की, "मी कधीही जास्त झोपणारा माणूस नाही. कधीकधी मी फक्त डोळे बंद करून विश्रांती घेतो. ती एक विश्रांतीची पद्धत आहे, पण लोक त्यावेळी फोटो काढतात आणि मी झोपलो आहे असे भासवतात."
व्हाईट हाऊसचे अधिकृत निवेदन
ट्रम्प यांच्या प्रकृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यावर व्हाईट हाऊसनेही अधिकृत माहिती दिली आहे. त्यांच्या डॉक्टरांच्या मते, ट्रम्प यांना 'क्रॉनिक वेनस इनसफिशिएंसी' नावाचा त्रास आहे, जो ७० वर्षांवरील व्यक्तींमध्ये सामान्य असतो. यामुळे पायांना थोडी सूज येते. मात्र, ट्रम्प यांची हृदय आणि मूत्रपिंडाची स्थिती उत्तम असून ते परफेक्ट फिट असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. एकूणच, आपल्या आरोग्याबाबतच्या अफवांना ट्रम्प यांनी त्यांच्या नेहमीच्या आक्रमक आणि स्पष्टवक्तेपणाने उत्तर देऊन चर्चा शमवण्याचा प्रयत्न केला आहे.