जगाला घाबरवणारा किम जोंग उन स्वतःच का घाबरला? सुरक्षा व्यवस्थेत केला मोठा बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 16:24 IST2025-07-09T16:23:58+5:302025-07-09T16:24:29+5:30

Kim Jong Un Security : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने आपल्या सुरक्षेत मोठा बदल केला आहे.

Why did Kim Jong Un, who scared the world, become scared himself? He made a big change in the security system! | जगाला घाबरवणारा किम जोंग उन स्वतःच का घाबरला? सुरक्षा व्यवस्थेत केला मोठा बदल!

जगाला घाबरवणारा किम जोंग उन स्वतःच का घाबरला? सुरक्षा व्यवस्थेत केला मोठा बदल!

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने आपल्या सुरक्षेत मोठा बदल केला आहे. त्याने आपला मुख्य अंगरक्षक बदलला आहे. आता अशी चर्चा आहे की, त्याच्या सुरक्षेत असलेले सगळे जवानही बदलण्यात आले आहेत. सूत्रांनुसार, गुप्तहेरांचा धोका आणि स्वतःच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन किमने हा निर्णय घेतला आहे. जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसारख्या देशांशी थेट दुश्मनी असल्यामुळे किमची सुरक्षा नेहमीच चिंतेचा विषय असते.

इराणच्या घटनेनंतर किमची धास्ती
नॉर्थ कोरिया न्यूजच्या वृत्तानुसार, किम जोंग उन नुकताच एका पाहणी दौऱ्यावर गेला होता, तिथे त्याच्यासोबत नवीन सुरक्षा रक्षक आणि त्यांचा नवा प्रमुख दिसला. इराणच्या कमांडरांच्या नुकत्याच झालेल्या हत्येनंतर किमने हा बदल केल्याचं बोललं जातंय. अर्थात, उत्तर कोरियाने याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

नवा अंगरक्षक कोण आहे?
रिपोर्टमध्ये किमच्या नव्या मुख्य अंगरक्षकाचं नाव जाहीर करण्यात आलेले नाही, पण तो सेनेतील एक वरिष्ठ अधिकारी असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी त्याने सिंगापूर, व्हिएतनाम आणि रशियामध्येही काम केलं आहे. हा नवीन अंगरक्षक किम जोंग उनचा विश्वासू मानला जातो. विशेष म्हणजे, त्याच्याबद्दल उत्तर कोरियामध्ये किंवा बाहेरही कोणाला जास्त माहिती नाही. तो याआधीही पडद्यामागून किमसाठी काम करत होता. किमने आपला जुना मुख्य अंगरक्षक, किम चोल ग्यूला, आता राज्य व्यवहार आयोगाच्या गार्ड विभागात पाठवलं आहे.

किम जोंग उनची सुरक्षा व्यवस्था किती कडक आहे?
किम जोंग उनची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक आहे. तिची जबाबदारी एडजुटेंट्स नावाच्या सुरक्षा दलाकडे आहे, ज्यात सुमारे २०० ते ३०० जवान असतात. किमच्या सुरक्षेची व्यवस्था तीन स्तरांमध्ये विभागलेली आहे. पहिल्या स्तरात १२ जवान थेट किमच्या जवळ असतात. फक्त याच १२ जवानांना किमजवळ शस्त्र घेऊन येण्याची परवानगी असते.

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, किमच्या सुरक्षा दलात सामील होण्यासाठी अनेक कडक नियम आहेत. यातला एक महत्त्वाचा नियम म्हणजे, किम जोंग उनच्या सगळ्या अंगरक्षकांची उंची त्याच्याइतकीच असते. यामागे कारण असं की, कोणीही थेट किम जोंग उनला लक्ष्य करू नये.

किमच्या सुरक्षेत असलेल्या सर्व जवानांच्या किमान दोन पिढ्या सरकारशी निष्ठावान असल्या पाहिजेत. किम फक्त अशाच लोकांना आपल्यासोबत ठेवतो, ज्यांचे कुटुंब सरकारशी एकनिष्ठ राहिले आहेत.

Web Title: Why did Kim Jong Un, who scared the world, become scared himself? He made a big change in the security system!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.