जपानची ‘जेन झी’ का सोडतेय नोकऱ्या? जपानमध्ये आजवर असं कधीच घडलं नव्हतं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:22 IST2025-06-06T11:21:56+5:302025-06-06T11:22:15+5:30
या तरुण पिढीला आता कुठलंही ओझं नकोय

जपानची ‘जेन झी’ का सोडतेय नोकऱ्या? जपानमध्ये आजवर असं कधीच घडलं नव्हतं...
जपान हा एक असा देश आहे, जो संपूर्ण जगभरात कष्ट, मेहनत, निष्ठा, प्रामाणिकपणा यासाठी प्रसिद्ध आहे. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी स्वत:ला आपल्या कामासाठी झोकून दिलेलं असतं. ज्या ठिकाणी ते काम करतात, तिथेही आधी काम, त्यानंतर स्वत:ची काळजी हेच त्यांचं धोरण. अलीकडच्या काळात या पद्धतीत मात्र अचानक बदल होताना दिसतो आहे. विशेषतः ‘जेन झी’ पिढीमध्ये.
साधारणपणे १९९५ ते २०१२ या काळात ज्यांचा जन्म झाला आहे, अशा पिढीला ‘जेन झी’ किंवा झुमर्स जनरेशन असं म्हटलं जातं. या तरुण पिढीला आता कुठलंही ओझं नको आहे, कोणाची निष्ठा नको आहे, कोणासाठी विनाकारण त्यांना राबायचं नाहीए. कामाच्या ठिकाणीही ‘पैसा’ हे त्यांचं ध्येय नाहीए. त्यांना पद नको आहे, प्रमोशन नको आहे, प्रतिष्ठा नको आहे, एक एक पायरी वर चढत मोठ्या पदाची हाव त्यांना नाहीए. ‘परफॉर्मन्स बेस्ड प्रमोशन आणि बोनस’ त्यांना नको आहे, चांगलं काम केलं म्हणून वरिष्ठांकडून त्यांना पाठीवर कौतुकाची थाप नको आहे. राब राब राबून ‘उज्ज्वल भविष्यकाळ’ त्यांना नको आहे.
त्यांना हवा आहे ‘मी टाइम’! आज. आत्ता. लगेच. त्यांना हवा आहे स्वत:साठी वेळ. त्यांना जगायचं आहे स्वत:साठी. आपल्याला जे करावंसं वाटतं, ज्यात आपल्याला आनंद मिळेल, तेच त्यांना करायचंय. त्यासाठी नोकरीवर, पैशावर, फसव्या प्रतिष्ठेवर लाथ मारायची त्यांची तयारी आहे आणि सध्या तरी ते तेच करताहेत.
ही पिढी म्हणतेय, जे आमच्या वाड-वडिलांनी केलं, ते आम्हाला आता करायचं नाहीए. त्यांच्यासारखं आम्हाला स्वत:चं आयुष्य वाया घालवायचं नाहीए. त्यामुळे जपानमध्ये अक्षरशः हजारो तरुण अल्पावधीतच नोकऱ्या सोडताहेत. जे ‘नाइलाजानं’ नोकरी करताहेत, त्यांनाही तिथून लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे. त्यामुळे घड्याळाच्या ठोक्याला कामावर यायचं आणि वेळ झाली की त्या ठोक्याला बाहेर पडायचं, असा नवा शिरस्ता त्यांनी आता पाडला आहे.
जपानमध्ये आजवर असं कधीच नव्हतं. वैयक्तिक आयुष्यापेक्षाही आपल्या कामालाच त्यांनी आजवर महत्त्व दिलं. नव्या पिढीत मात्र हे चित्र आता पूर्णपणे उलटं होताना दिसतं आहे. जपानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या या संकल्पनेचं नाव आहे ‘क्वाएट क्विटिंग’! म्हणजे शांतपणे, काहीही कुरकुर न करता आपला जॉब सोडणं. खरं तर या संकल्पनेनं मूळ धरलं ते अमेरिकेत २०२२मध्ये. ज्या लोकांनी आपल्याला कामापासून अलिप्त ठेवलं आहे आणि जे कमीत कमी काम करतात त्यांच्यासाठी हा शब्दप्रयोग वापरला जात होता; पण हाच शब्दप्रयोग आता जपानमध्ये ‘जेन झी’ पिढीसाठी वापरला जातो आहे.
जपानमधील एका संशोधन संस्थेनं या संदर्भात नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात दिसून आलं, या पिढीतील तब्बल ४५ टक्के तरुण केवळ आवश्यक तेवढंच काम करताहेत. वेळ येताच ते जॉब सोडताहेत आणि तो वेळ आपल्या आनंदासाठी घालवताहेत.
हे तरुण सांगतात, कामावर आमचा राग, त्रागा नाहीए. काम केलं तरच आम्ही घराचं भाडं, इतर बिलं भरू शकू हे आम्हाला माहीत आहे; पण हे आयुष्य एकदाच येतं हेही आम्हाला माहीत आहे. त्याचमुळे ते आम्हाला पुरेपूर जगून घ्यायचंय !