अमेरिकेत सेक्स स्कँडल कोणाला भोवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 07:23 IST2025-07-18T07:22:09+5:302025-07-18T07:23:36+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पपासून ते माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, प्रिन्स ॲण्ड्र्यू, एफबीआयचे डेप्युटी डायरेक्टर डॅनियल बोंगिनो यांची आणि इतर अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावं या प्रकरणात घेतली जात आहेत. 

Who will be involved in a sex scandal in America? Donald Trump, FBI Director... | अमेरिकेत सेक्स स्कँडल कोणाला भोवणार?

अमेरिकेत सेक्स स्कँडल कोणाला भोवणार?

जेफ्री एपस्टाईन. १० ऑगस्ट २०१९ रोजी त्यांन न्यू यॉर्कच्या तुरुंगात आत्महत्या केली. पण, याच जेफ्री एपस्टाईनवरून सध्या अमेरिकेचं राजकारण आणि वातावरण अतिशय तापलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पपासून ते माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, प्रिन्स ॲण्ड्र्यू, एफबीआयचे डेप्युटी डायरेक्टर डॅनियल बोंगिनो यांची आणि इतर अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावं या प्रकरणात घेतली जात आहेत. 

मुळात हा जेफ्री एपस्टाईन आहे तरी कोण? अमेरिकेत अतिशय गाजलेल्या सेक्स स्कँडल प्रकरणात जेफ्री हा एक प्रमुख आरोपी होता. त्याचं आयुष्य अनेक वळणांनी आणि रहस्यांनी भरलेलं होतं. तो अमेरिकेतील एक प्रसिद्ध फायनान्सर होता. न्यू यॉर्कमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या जेफ्रीनं डाल्टन स्कूलमध्ये शिक्षक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. १९७६मध्ये त्याला शाळेतून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर त्यानं बँकिंग आणि वित्त क्षेत्रात प्रवेश केला. स्वत:ची फर्म सुरू केली आणि बघता बघता तो करोडपती झाला. अनेक मोठमोठ्या लोकांशी नंतर त्यानं संबंध प्रस्थापित केले. अमेरिकेतील अनेक उद्योजक, सेलिब्रिटी, राजकारणी, अब्जाधीश आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांशी त्याची जानपहचान आणि मैत्री झाली. नंतर महिला आणि बाललैंगिक शोषणातही तो अडकला. ताे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एक उच्चभ्रू सामाजिक वर्तुळ निर्माण केलं आणि त्यांनी अनेक महिला, अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केलं. 
सगळ्यांत पहिल्यांदा २००५मध्ये फ्लोरिडाच्या पाम बीचवर त्याला अटक करण्यात आली. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला लैंगिक संबंधांसाठी पैसे दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. याशिवाय डझनावारी मुलींनी त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. २००८मध्ये त्याला १३ महिन्यांची शिक्षा झाली. जेफ्रीला दोषी ठरविल्यानंतर अनेक ‘मान्यवरांनी’ त्याची साथ सोडली. त्यानंतरही सुमारे दशकभर जेफ्री आपल्या ‘परोपकारी’ कार्यांद्वारे श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोकांच्या संपर्कात होता. 

२००९मध्ये व्हर्जिनिया ग्रिफ्रे या महिलेनं त्याच्यावर आरोप केला की ती अल्पवयीन असतानाही जेफ्रीनं तिला लैंगिक तस्करीसाठी भाग पाडलं. २०११मध्ये तिनं या प्रकरणात ब्रिटनचे प्रिन्स ॲण्ड्र्यू यांचंही नाव घेतलं. २०१५मध्ये जेफ्री एपस्टाईनवर पुन्हा खटला दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलींची लैंगिक तस्करी आणि ‘वेश्या नेटवर्क’ चालविण्याबाबत जेफ्रीला २०१९मध्ये पुन्हा अटक करण्यात आली आणि त्याला दोषीही ठरविण्यात आलं. पण १० ऑगस्ट २०१९ रोजी जेफ्रीनं न्यू यॉर्कच्या तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. 

याच जेफ्री एपस्टाईन सेक्स स्कँडलच्या फायलींवरून अमेरिकेत मोठा विवाद सुरू आहे. इलॉन मस्क यांनीही नुकताच दावा केला होता की या फायलींमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव आहे आणि त्यामुळेच या फायली सार्वजनिक करण्यात आल्या नव्हत्या. या प्रकरणातील एका दहा तासांच्या व्हिडिओवरूनही वादळ उठलं आहे. यातील एक मिनिटाची क्लिप ‘गायब’ असल्याने यात काहीतरी ‘कट’ शिजत असल्याचाही आरोप होतो आहे. त्यासाठी एफबीआयचे डेप्युटी डायरेक्टर डॅनियल बोंगिनो यांना जबाबदार धरण्यात येत आहे.

Web Title: Who will be involved in a sex scandal in America? Donald Trump, FBI Director...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.