डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 11:52 IST2025-05-31T11:50:53+5:302025-05-31T11:52:19+5:30
Elon Musk News: टेस्लाचे प्रमुख एलन मस्क हे शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत सहभागी झाले होते. मात्र यावेळी मस्क यांच्या कामापेक्षा त्यांच्या काळ्यानिळ्या झालेल्या डोळ्याचीच चर्चा अधिक झाली.

डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती
टेस्लाचे प्रमुख एलन मस्क हे शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत सहभागी झाले होते. मात्र यावेळी मस्क यांच्या कामापेक्षा त्यांच्या काळ्यानिळ्या झालेल्या डोळ्याचीच चर्चा अधिक झाली. एलन मस्क यांना नेमकं झालंय काय? असा प्रश्न लोकांना पडला होता. याबाबत एलन मस्क यांना विचारले असता त्यांनी ही माझ्या लिटिल एक्स या पाच वर्षांच्या मुलाने मला दिलेली भेट आहे असे सांगितले.
मस्क म्हणाले की, मी एक्स सोबत खेळत होतो. तेव्हा गमती गमतीत त्याला सांगितलं की तोंडावर बुक्की मार. तेव्हा त्याने खरोखरच बुक्की मारली. त्यावेळी फारसं काही वाटलं नाही. मात्र नंतर डोळ्यांवर सूज आणि काळा डाग आला.
एलन मस्क यांनी असं सांगितल्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘’खरोखरच एक्सने असं केलं? तो करू शकतो. तुम्ही एक्सला ओखळत असाल तर हे माहिती असेल.’’ दरम्यान, या दुखापतीविषयी पत्रकारांनी सुरुवातीला विचारल्यावर एलन मस्क यांनी गमतीदार उत्तर दिलं. ते म्हणाले की. ‘’मी फ्रान्सजवळ नव्हतो’’. त्यावेळी त्यांचा इशारा हा फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्राँ यांची पत्नी ब्रिजिक मॅक्राँ यांच्याकडे होता. त्या हल्लीच आपले पती आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्राँ यांना मारताना दिसल्या होत्या.
दरम्यान, एलन मस्क हे व्हाइट हाऊसमध्ये कार्यरत राहणार असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, मस्क हे खरोखरच कुठेही जात नाही आहेत. ते वेळोवेळी व्हाईट हाऊसमध्ये परतत राहतील. कारण DOGE हे त्यांचंच अपत्य आहे.