पाक लष्कराचा 'बॉस' कोण? COAS मुनीर यांचा कार्यकाळ संपला, पण CDFचे पद रिकामेच! नेमका अडसर कशाचा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:52 IST2025-12-01T13:51:47+5:302025-12-01T13:52:38+5:30
पाकिस्तानचे जनरल आसिम मुनीर यांनी २९ नोव्हेंबरच्या रात्री लष्कर प्रमुख म्हणून आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.

पाक लष्कराचा 'बॉस' कोण? COAS मुनीर यांचा कार्यकाळ संपला, पण CDFचे पद रिकामेच! नेमका अडसर कशाचा?
पाकिस्तानमध्ये सध्या लष्करी नेतृत्व आणि राजकारणामध्ये मोठी उलथापालथ सुरू आहे. सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे माजी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांना 'चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस' हे महत्त्वाचे आणि नवीन पद अद्याप मिळालेले नाही. २९ नोव्हेंबर रोजी त्यांचा चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कार्यकाळ अधिकृतपणे संपला आहे. संसदेची मंजुरी आणि राष्ट्रपतींकडून अधिकृत परवानगी मिळून देखील या नवीन पदाच्या नियुक्तीची अधिसूचना जाहीर न झाल्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
आसिम मुनीर सध्या कोणत्या पदावर?
जनरल आसिम मुनीर यांनी २९ नोव्हेंबरच्या रात्री लष्कर प्रमुख म्हणून आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांना आता वाढीव अधिकार असलेले 'चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस' हे नवीन पद मिळणार होते. या पदावर त्यांची नियुक्ती झाल्याने त्यांची शक्ती कमालीची वाढणार होती. मात्र, २९ नोव्हेंबरची डेडलाईन उलटूनही, सार्वजनिकरित्या कोणतीही अधिसूचना जारी न झाल्याने, आसिम मुनीर सध्या कोणत्या पदावर आहेत, याबाबत स्पष्टता नाही.
'चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस' पदामुळे मुनीर यांची ताकद वाढणार!
शहबाज शरीफ सरकारने नुकतेच २७व्या घटनादुरुस्तीद्वारे 'चेअरमन जॉईंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी' या पदाच्या जागी 'चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस' हे नवीन पद तयार केले आहे. यामुळे पाकिस्तानी लष्करप्रमुखाला सैन्य कमांडच्या संरचनेत सर्वात वरचे स्थान मिळते. 'चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस' पदानंतर आसिम मुनीर यांना तिन्ही सेना आणि नॅशनल स्ट्रॅटेजिक कमांडवर नियंत्रण मिळणार आहे.
याच बदलामुळे, २७ नोव्हेंबर रोजी 'चेअरमन जॉईंट चीफ्स ऑफ स्टाफ' पदावरून जनरल साहिर शमशाद मिर्झा निवृत्त झाले आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आसिम मुनीर यांच्याकडे लागले आहे.
नेमका कशामुळे होतोय विलंब?
आसिम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्तीला होत असलेल्या विलंबाबद्दल अफवा वाढू लागल्यावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. ख्वाजा आसिफ यांनी सोशल मीडिया साइट 'एक्स'वर स्पष्ट केले की, सीडीएफच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि यात कोणत्याही प्रकारच्या अफवांना वाव नाही.
सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान शहबाज शरीफ सध्या युनायटेड किंगडममध्ये आहेत आणि ते आज रात्री मायदेशी परतणार आहेत. ख्वाजा आसिफ यांनी आश्वासन दिले आहे की, पंतप्रधान परतल्यावर योग्य वेळी नवीन सीडीएफबाबत अधिसूचना जारी केली जाईल. पुढील आठवड्यात पंतप्रधान शहबाज शरीफ लंडनहून परतल्यावर, 'चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस' पदासाठी औपचारिक कमांड समारंभ होण्याची शक्यता आहे. या समारंभापूर्वीच ही बहुप्रतिक्षित अधिसूचना अधिकृतपणे सार्वजनिक केली जाईल, अशी अपेक्षा आहे.