कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:17 IST2025-12-04T11:15:54+5:302025-12-04T11:17:24+5:30
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या 'रिवॉर्ड्स फॉर जस्टिस' कार्यक्रमाने ही घोषणा केली असून, तिचीअचूक माहिती देणाऱ्या व्यक्तीला मोठे इनाम दिले जाणार आहे.

कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
अमेरिकेच्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील सिस्टीमवर सायबर हल्ला करणाऱ्या इराणच्या दोन सायबर गुन्हेगारांवर अमेरिकेने तब्बल १० दशलक्ष डॉलरचे घसघशीत बक्षीस जाहीर केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या 'रिवॉर्ड्स फॉर जस्टिस' कार्यक्रमाने ही घोषणा केली असून, या दोन हॅकर्सची अचूक माहिती देणाऱ्या व्यक्तीला हे इनाम दिले जाणार आहे. विदेशी सरकारकडून अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण प्रणालींवर हे सायबर हल्ले घडवून आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्सशी संबंधित 'शाहिद शुश्तारी' या धोकादायक सायबर ग्रुपच्या सदस्यांवर अमेरिकेने ही कारवाई केली आहे.
कोण आहेत हे दोन सायबर गुन्हेगार?
अमेरिकेने ज्या दोन मोस्ट वॉन्टेड लोकांची माहिती जाहीर केली आहे, त्यांची नावे फतेमेह सेदिकियन काशी आणि मोहम्मद बाघेर शिरिनकर अशी आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्स इंटेलिजन्स ऑर्गनायझेशनशी जोडल्या गेलेल्या 'शाहिद शुश्तारी' नावाच्या एका अत्यंत धोकादायक सायबर ग्रुपचे सदस्य आहेत. याच ग्रुपने यापूर्वी अमेरिकेच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर अनेक मोठे सायबर हल्ले केले आहेत.
'शाहिद शुश्तारी' ग्रुपचे घातक काम काय?
अमेरिकेच्या अहवालानुसार, सेदिकियन आणि शिरिनकर हे दोघे मिळून सायबर हल्ल्यांची योजना आखतात आणि अंमलात आणतात. 'शाहिद शुश्तारी' हा समूह इराणच्या सायबर-इलेक्ट्रॉनिक कमांडच्या अखत्यारीत काम करतो. महत्त्वाचे म्हणजे, हा गट यापूर्वी आरिया सेपेहर अयंदेह साजान, इमान नेट पसारगद, नेट पेगार्ड समावत अशा अनेक वेगवेगळ्या नावांनी काम करत होता.
या समूहाने सायबर आणि हेरगिरीच्या माध्यमातून अमेरिका, युरोप आणि मध्य पूर्वमधील अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांना लक्ष्य केले आहे. यामध्ये न्यूज मीडिया, शिपिंग, ऊर्जा, वित्त, दूरसंचार आणि पर्यटन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. यांच्या हल्ल्यांमुळे खासगी कंपन्या आणि सरकारी संस्थांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, तसेच दैनंदिन कामांमध्ये गंभीर अडथळे निर्माण झाले आहेत.
अमेरिकेच्या निवडणुकीतही केले होते 'सायबर कॅम्पेन'
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२० पासून या 'शाहिद शुश्तारी' समूहाने अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी एक मोठ सायबर मोहिम चालवली होती. यापूर्वीही, हा ग्रुप बनावट ओळखपत्रे वापरून गुप्त माहिती गोळा करणे आणि सायबर हल्ल्यांची तयारी करण्यात गुंतलेला होता.
यापूर्वीही झालेत निर्बंध
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले आहे की, १७ नोव्ह २०२१ रोजी अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने शाहिद शुश्तारी आणि त्यांच्या ६ कर्मचाऱ्यांवर निर्बंध लादले होते. कारण, ते २०२० च्या अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत होते. अमेरिकेला आशा आहे की, या दोघांच्या अटकेमुळे ईराणच्या सायबर नेटवर्क आणि त्यांच्या ऑपरेशन्सबद्दल महत्त्वाची गोपनीय माहिती मिळू शकेल.