इराणमध्ये खामेनी सरकारची झोप उडवणारी 'ती' ६३ वर्षीय महिला कोण? सगळीकडेच रंगलीये चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 12:59 IST2026-01-18T12:58:28+5:302026-01-18T12:59:11+5:30
इराणमधील खामेनी सरकारला हादरवून सोडणाऱ्या आणि देशभरात आंदोलनाची लाट निर्माण करणाऱ्या एका ६३ वर्षीय महिलेला सुरक्षा दलांनी अटक केली आहे.

इराणमध्ये खामेनी सरकारची झोप उडवणारी 'ती' ६३ वर्षीय महिला कोण? सगळीकडेच रंगलीये चर्चा!
कट्टरतावादी सत्ता आणि जनक्षोभ यांच्या संघर्षात होरपळणाऱ्या इराणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणमधील खामेनी सरकारला हादरवून सोडणाऱ्या आणि देशभरात आंदोलनाची लाट निर्माण करणाऱ्या एका ६३ वर्षीय महिलेला सुरक्षा दलांनी अटक केली आहे. नाजनीन बरादरन असे या महिलेचे नाव असून, त्या आंदोलकांच्या मुख्य सूत्रधार असल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला आहे.
गुप्तचर यंत्रणांनी रचला सापळा
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दिलेल्या माहितीनुसार, नाजनीन बरादरन यांना एका अत्यंत गुंतागुंतीच्या इंटेलिजन्स ऑपरेशननंतर ताब्यात घेण्यात आले आहे. ६३ वर्षीय नाजनीन यांनी केवळ आंदोलनाचे नेतृत्वच केले नाही, तर आंदोलनाला हिंसक वळण देण्यामागेही त्यांचाच मेंदू असल्याचा खळबळजनक आरोप इराण सरकारने केला आहे. विशेष म्हणजे, अटकेनंतर देशातील आंदोलनांचा जोर ओसरल्याचा दावाही तिथल्या सरकारी माध्यमांनी केला आहे.
'राहा परहम' कोडनेम आणि विदेशी कनेक्शन
तपासात असे समोर आले आहे की, नाजनीन बरादरन या 'राहा परहम' या कोडनेमचा वापर करून आपले जाळे विणत होत्या. त्यांचे संबंध इराणचे निर्वासित प्रिन्स रझा पहलवी यांच्याशी असल्याचे बोलले जात आहे. रजा पहलवी हे इराणच्या शेवटच्या शहांचे चिरंजीव असून ते सध्या परदेशातून खामेनी सरकारविरोधात मोहीम राबवत आहेत. इतकेच नाही तर, पहलवी यांच्या माध्यमातून नाजनीन या अमेरिकेची गुप्तचर संस्था 'सीआयए'आणि इस्रायलच्या संपर्कात होत्या, असा संशय इराणने व्यक्त केला आहे.
कोण आहेत नाजनीन बरादरन?
नाजनीन यांचा जन्म १९६३ मध्ये झाला. त्यांनी शिराज विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्या गेल्या अनेक वर्षांपासून इराणमधील सामाजिक प्रश्नांवर, विशेषतः महिला सक्षमीकरणासाठी लढा देत आहेत. महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या एका सुशिक्षित महिलेने थेट सरकारला आव्हान दिल्याने इराणमध्ये खळबळ उडाली आहे.
खामेनींचा अमेरिकेवर थेट हल्ला
या प्रकरणावर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी प्रथमच मौन सोडले आहे. त्यांनी या सर्व प्रकारामागे अमेरिकेचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. "इराणमध्ये जो काही हिंसाचार आणि जीवितहानी झाली, त्याला केवळ आणि केवळ अमेरिका जबाबदार आहे. इराणला पुन्हा एकदा राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या आपल्या गुलामगिरीत ढकलण्याचा अमेरिकेचा डाव आहे," असा घणाघाती आरोप खामेनी यांनी केला आहे.
दुसरीकडे, प्रसिद्ध वृत्तसंस्था 'रॉयटर्स'ने या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही. मात्र, नाजनीन यांच्या अटकेमुळे इराणमधील महिलांच्या हक्कांचा लढा पुन्हा एकदा जागतिक चर्चेचा विषय ठरला आहे.