कोण आहेत ‘अमेरिकेला धडा शिकवू’ म्हणणारे अली लारिजानी? जगाचे लक्ष केंद्रित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 06:00 IST2026-03-04T06:00:16+5:302026-03-04T06:00:41+5:30
Who is Ali Larijani: १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर त्यांनी इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्समध्ये प्रवेश केला. पुढे ते सांस्कृतिक मंत्री, सरकारी प्रसारमाध्यम प्रमुख आणि २००८ ते २०२० दरम्यान सलग तीन कार्यकाळ इराणी संसद ‘मजलिस’चे अध्यक्ष राहिले.

कोण आहेत ‘अमेरिकेला धडा शिकवू’ म्हणणारे अली लारिजानी? जगाचे लक्ष केंद्रित
तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर इराणचे नेतृत्व सध्या ज्यांच्याकडे आहे ते ६७ वर्षीय अली लारिजानी यांच्याकडे जगाचे लक्ष केंद्रित झाले आहे. दीर्घकाळ इराणी सत्तावर्तुळात प्रभावी राहिलेले आणि तुलनेने व्यवहारवादी म्हणून ओळखले जाणारे लारिजानी आता अधिक कठोर भूमिकेत दिसत आहेत.
३ जून १९५८ रोजी इराकमधील नजफ येथे जन्मलेले लारिजानी अमोल येथील श्रीमंत आणि धार्मिक कुटुंबातून आले आहेत. २००९ मध्ये ‘टाईम’ मासिकाने त्यांच्या कुटुंबाला “इराणचे केनेडी” अशी उपमा दिली होती. त्यांचे वडील मिर्झा हाशेम अमोली हे प्रख्यात धर्मगुरू होते. त्यांच्या भावांनीही न्यायव्यवस्था आणि ‘असेम्ब्ली ऑफ एक्स्पर्ट्स’सारख्या प्रभावी संस्थांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
धार्मिक पार्श्वभूमी असूनही लारिजानी यांनी गणित आणि संगणकशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर तेहरान विद्यापीठातून पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पूर्ण केली. त्यांनी जर्मन तत्त्वज्ञ इमॅन्युएल कान्ट यांच्यावर प्रबंध लिहिला आहे.
१९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर त्यांनी इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्समध्ये प्रवेश केला. पुढे ते सांस्कृतिक मंत्री, सरकारी प्रसारमाध्यम प्रमुख आणि २००८ ते २०२० दरम्यान सलग तीन कार्यकाळ इराणी संसद ‘मजलिस’चे अध्यक्ष राहिले. २०१५ च्या अणुकराराला संसदेची मंजुरी मिळवून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. खामेनेई यांच्या निधनानंतर स्थापन झालेल्या नेतृत्वासोबत लारिजानी यांच्याकडे इराणच्या सुरक्षा धोरणाची सूत्रे असल्याचे मानले जाते. इस्रायल आणि अमेरिकेसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणची रणनीती ठरवण्यात त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. एकेकाळी व्यवहारवादी म्हणून ओळखले जाणारे लारिजानी आता अधिक आक्रमक भूमिकेत दिसत असल्याने, इराणच्या पुढील पावलांकडे जगाचे लक्ष लागले आहे.
खामेनेई आणि इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे प्रमुख मोहम्मद पाकपूर ठार झाल्यावर लारिजानी यांनी दूरचित्रवाणीवरून कठोर संदेश दिला. “अमेरिका आणि झायोनिस्ट राजवटीने इराणी राष्ट्राचे हृदय पेटवले आहे. त्यांना धडा शिकवू,” असे त्यांनी जाहीर केले. ट्रम्प इस्रायली सापळ्यात अडकल्याचा आरोप त्यांनी केला.