कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 14:38 IST2026-04-03T14:36:57+5:302026-04-03T14:38:23+5:30
Donald Trump Remark: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईस्टरनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात एक केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
Donald Trump Remark: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये आयोजित ईस्टर लंच कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. ट्रम्प यांनी पाम संडेचा उल्लेख करताना लोक आता मला “किंग” म्हणतात असे म्हणत विनोदी शैलीत वक्तव्य केले. मात्र, त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली.
ईस्टर कार्यक्रमात ट्रम्प यांचे वक्तव्य
बुधवार(2 एप्रिल 2026) रोजी व्हाइट हाऊसमध्ये ईस्टर लंच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ट्रम्प यांनी पाम संडेचा संदर्भ देताना सांगितले की, त्या दिवशी येशू ख्रिस्त यांचे लोकांनी राजासारखे स्वागत केले होते. आता लोक मला देखील किंग म्हणतात. या वक्तव्यावर कार्यक्रमात काही ठिकाणी हशा देखील ऐकू आला, मात्र त्यानंतर यावरून वाद निर्माण झाला.
BREAKING: Televangelist Paula White compares Trump to Jesus because they were both “betrayed and arrested and falsely accused.”
— Really American 🇺🇸 (@ReallyAmerican1) April 1, 2026
This person is employed by the White House. pic.twitter.com/wN6HE3kVEJ
ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना
याच कार्यक्रमात व्हाइट हाऊसच्या आध्यात्मिक सल्लागार पाउला व्हाइट-कैन यांनी ट्रम्प यांच्या आयुष्याची तुलना थेट येशू ख्रिस्त यांच्या जीवनाशी केली. त्या म्हणाल्या, जसे येशू ख्रिस्त यांनी बलिदान आणि कठीण परिस्थितीचा सामना केला, तसेच ट्रम्प यांनीही कठीण काळ अनुभवला आहे.
त्यांनी 2024 मध्ये ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत सांगितले की, त्यांना धोका दिला गेला, त्यांच्यावर आरोप करण्यात आले, त्यांच्या जीवालाही धोका होता. जसे येशू शेवटी विजयी झाले, तसेच ट्रम्पही विजयी होतील. देव त्यांच्या सोबत आहे. या वक्तव्यामुळे आता हा वाद अधिक वाढला आहे.
सोशल मीडियावर टीका
ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली. अनेकांनी या टिप्पणी धार्मिक भावना दुखावणाऱ्या असल्याचे म्हटले. काही धार्मिक नेते आणि राजकीय नेत्यांनीही यावर नाराजी व्यक्त केली. डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते मॅल्कम केन्याटा यांनी बायबलमधील ओळी शेअर करत कोणालाही देवासारखे मानू नये असे म्हटले. अनेकांनी धार्मिक नेते उपस्थित असताना त्यांनी प्रतिक्रिया का दिली नाही, असा सवालही उपस्थित केला.