"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 03:37 IST2025-07-05T03:36:54+5:302025-07-05T03:37:15+5:30
मसूद अझहरचा विचार करता, त्याला अटक करणे शक्य होत नाहीये, कारण तो सापडू शकत नाहीये. महत्वाचे म्हणजे, मसूद अझहर अफगाणिस्तानात असावा, असे आम्हाला वाटते, असेही बिलावर यांनी म्हटले आहे.

"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरसंदर्भात असे विधान केले आहे, जे खुद्द पाकिस्तानी जनताच नाकारेल. जैश-ए-मोहम्मदचे (जेईएम) मुख्यालय पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये आहे, यासंदर्भात भारताने अनेक वेळा पुरावे दिले आहेत. मसूद अझहर नेमका कुठे लपून बसला आहे, हे पाकिस्तानातील जवळजवळ प्रत्येकालाच माहीत असेल. मात्र मसूद अझहर कुठे आहे? हे आम्हाला माहित नाही, असे बिलावल भुट्टो यांनी म्हटले आहे.
'तर त्याला अटक करायला पाकिस्तानलाही आनंदच होईल...' -
अल जझीराला दिलेल्या मुलाखतीत बिलावल भुट्टो म्हणाले, जर भारताने तो (मसूद अझहर) पाकिस्तानच्या भूमीवर असल्याची माहिती दिली, तर त्याला अटक करायला पाकिस्तानलाही आनंदच होईल. गेल्या वर्षीच बहावलपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान मसूद अझहर उघड्यावर फिरताना आणि भारताविरुद्ध गरळ ओकताना दिसला होता.
मसूद अझहर अफगाणिस्तानात असावा, असे आम्हाला वाटते -
दरम्यान, हाफिज सईद मुक्तपणे फिरत असल्याच्या प्रश्नावर भुट्टो म्हणाले, हाफिज सईद हा मुक्त आहे, असे म्हणने तथ्यात्मकदृष्ट्या योग्य आहे. ते म्हणाले की सईद पाकिस्तानच्या ताब्यात आहे. मात्र, मसूद अझहरचा विचार करता, त्याला अटक करणे शक्य होत नाहीये, कारण तो सापडू शकत नाहीये. महत्वाचे म्हणजे, मसूद अझहर अफगाणिस्तानात असावा, असे आम्हाला वाटते, असेही बिलावर यांनी म्हटले आहे.