भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 07:35 IST2025-05-06T07:35:21+5:302025-05-06T07:35:54+5:30
पाकिस्तानने या बैठकीची विनंती केली होती जेणेकरून दक्षिण आशियात निर्माण होणारा संघर्ष टाळता येईल.

भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..."
नवी दिल्ली - भारतपाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीत संभाव्यपणे दोन्ही देशातील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा झाली. त्यानंतर यूएनमध्ये एक पत्रकार परिषद घेत पाकिस्तानी दूत असीम इफ्तिखार यांनी यूनएससीच्या बैठकीत जे पाहिजे होते, ते मिळाले असं विधान केले. या बैठकीत पाकिस्तानने जम्मू काश्मीर वाद सोडवण्यावरही चर्चा झाल्याची माहिती दिली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या सैन्य कारवाईच्या भीतीने पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याची मागणी केली. या बैठकीत सुरक्षा परिषदेने भारताला संयम बाळगण्याचा सल्ला द्यावा असा प्रयत्न पाकिस्तानचा होता. ही बैठक UNSC च्या चेंबरमध्ये नाही तर कंसल्टेशन रुममध्ये आयोजित करण्यात आली होती. पाकिस्तानने या बैठकीची विनंती केली होती जेणेकरून दक्षिण आशियात निर्माण होणारा संघर्ष टाळता येईल.
जम्मू काश्मीरवरही बैठकीत चर्चा
पाकिस्तानी दूत असीम इफ्तिखार यांनी म्हटलं की, या बैठकीत संयुक्त राष्ट्र परिषदेच्या अनेक सदस्यांनी काश्मीरच्या लोकांच्या इच्छेनुसार जम्मू काश्मीर वादासह इतर सर्व मुद्दे शांततेने सोडवण्याच्या प्रयत्नांना मान्यता दिली. प्रादेशिक शांतता एकतर्फी होऊ शकत नाही त्यासाठी राजनैतिक, संवाद आणि जागतिक कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे हेदेखील मान्य झाल्याचे सांगितले. भारत पाकिस्तान मुद्द्यावर यूएनएससीच्या बैठकीवर कौन्सिलकडून अद्याप काही अपडेट आले नाहीत. परंतु पाकच्या मीडियाने असीम इफ्तिखारच्या हवाल्याने म्हटलंय की, आम्ही भारताच्या अलीकडच्या एकतर्फी पावलांबाबत, विशेषत: २३ एप्रिलनंतर अवैध कारवाई, सैन्य कारवाई आणि चिथावणीखोर विधानांवर चिंता व्यक्त केली आहे असं सांगण्यात आले.
शहबाज शरीफ यांनी दोनदा यूएन चीफशी केली चर्चा
२२ एप्रिल पहलगाम हल्ल्यानंतर २३ एप्रिलला भारताने ५ घोषणा केल्या. ज्यात सिंधु जल कराराला स्थगिती देण्यात आली. या निर्णयामुळे पाकिस्तानात पाण्याची मोठी समस्या उभी राहण्याची शक्यता आहे. त्यातून पाकिस्तानला आर्थिक नुकसान होईल. त्याशिवाय शहबाज शरीफ सरकारने यूएनकडे हस्तक्षेप करण्याचं आवाहन केले आहे. भारताच्या कठोर इशाऱ्यानंतर शहबाज शरीफ दोनदा यूएन प्रमुखांशी बोलले आहेत. सुरक्षा परिषदेच्या बैठकीपूर्वीही त्यांनी प्रमुख एंटोनिया गुटेरेस यांच्याशी फोनवरून संवाद साधला. भारताने आतापर्यंत पाकिस्तानला आर्थिक नुकसान होण्याचा मार्ग पत्करला आहे असं त्यांनी गुटेरेस यांना म्हटलं.