थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 13:35 IST2025-12-04T13:35:15+5:302025-12-04T13:35:51+5:30
थायलंडला फिरायला गेलेल्या दोन उद्योजक मित्रांचा हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
जोधपूरहून पत्नी-मुलांसोबत थायलंडला फिरायला गेलेल्या दोन उद्योजक मित्रांचा हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. १ डिसेंबर रोजी ही हृदयद्रावक घटना घडली. दोन्ही मित्रांचे मृतदेह हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये आढळले. अनिल कटारिया आणि हरीश देवानी अशी मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यावेळी नेमके काय घडले, हे अद्याप समोर आले नसले, तरी एका मित्राला बुडताना पाहून दुसऱ्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असावा आणि या प्रयत्नात दोघांचाही बुडून मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
नेमके काय घडले?
जोधपूरच्या रातानाडा भागातील रहिवासी असलेले अनिल कटारिया आणि हरीश देवानी हे दोघे मित्र कुटुंबासोबत काही दिवसांपूर्वी थायलंडला सहलीसाठी गेले होते. १ डिसेंबरच्या सायंकाळी हरीश आणि अनिल हे दोघेही आपापल्या खोलीतून हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये आंघोळीसाठी उतरले. मात्र, दीड तासानंतरही ते परतले नाहीत. यामुळे त्यांच्या पत्नींनी त्यांची शोधाशोध सुरू केली. पूल आणि आजूबाजूला न सापडल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला.
सीसीटीव्हीमध्ये दिसले धक्कादायक दृश्य
कर्मचाऱ्यांनी शोध घेतल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोघेही स्विमिंग पूलमध्ये बुडताना दिसले. त्यानंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. अनिल कटारिया यांचे रातानाडा परिसरात ‘जीमण रेस्टॉरंट’ आहे, तर हरीश देवानी यांचे ग्लास पेंटिंगचे वर्कशॉप होते. हरीश हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले कलाकार होते.
कुटुंबीय थायलंडमध्येच, आज मृतदेह येणार
मृत्यूची बातमी मिळताच, जोधपूरहून हरीशचा मोठा मुलगा आणि अनिलचा एक नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तातडीने थायलंडला रवाना झाले. थायलंडमध्ये सध्या हरीशची पत्नी, अनिलची पत्नी आणि त्यांचा दीड वर्षाचा मुलगा आहेत.
शव भारतात आणण्याची औपचारिकता पूर्ण झाली असून, आज, गुरुवारी सायंकाळपर्यंत दोन्ही मित्रांचे मृतदेह जोधपूरमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे दोघांच्याही घरी आणि जोधपूर शहरात शोकाकुल वातावरण आहे. अनिल यांच्या वडिलांना मात्र या घटनेची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध कलाकार होते हरीश देवानी
मृत हरीश देवानी हे केवळ उद्योजक नव्हते, तर ते ग्लास पेंटिंगचे प्रसिद्ध कलाकार होते. ते काचेवर वाळूच्या सहाय्याने अतिशय आकर्षक कलाकृती साकारत असत. ट्रान्स-प्रिंट काचेवर कलाकृती कोरणाऱ्या जगातील मोजक्या कलाकारांपैकी ते एक होते. त्यांची कला पाहण्यासाठी अनेक विदेशी नागरिक जोधपूरला येत असत, तसेच ते परदेशी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणही देत असत.