"शहिदांच्या बलिदानाचा बदला घेणार, 'होर्मुझ' बंदच राहणार"; इराणच्या नव्या 'सुप्रीम लीडर'चा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 19:20 IST2026-03-12T19:14:43+5:302026-03-12T19:20:42+5:30
मोजताबा खामेनी इराणच्या सत्तेवर, पदभार स्वीकारताच अमेरिका-इस्रायलला थेट युद्धाची धमकी

"शहिदांच्या बलिदानाचा बदला घेणार, 'होर्मुझ' बंदच राहणार"; इराणच्या नव्या 'सुप्रीम लीडर'चा इशारा
Mojtaba Khamenei: इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या निधनानंतर, त्यांचे पुत्र मोजताबा खामेनी यांनी इराणची सूत्रे अधिकृतपणे हाती घेतली आहेत. सर्वोच्च नेते म्हणून नियुक्त झाल्यानंतर मोजताबा यांनी गुरुवारी पहिली प्रतिक्रिया दिली. या संदेशात त्यांनी अमेरिका आणि इस्रायलवर आगपाखड करत, मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करण्याची थेट धमकी दिली आहे.
अमेरिकन तळे तात्काळ बंद करा, अन्यथा...
आपल्या पहिल्याच भाषणात मोजताबा खामेनी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "या भागातील अमेरिकेचे सर्व लष्करी तळ तात्काळ बंद केले पाहिजेत, अन्यथा त्यांच्यावर भीषण हल्ले केले जातील," असा इशारा त्यांनी दिला. महत्त्वाचे म्हणजे, नियुक्तीनंतर मोजताबा अद्याप सार्वजनिकरीत्या लोकांसमोर आलेले नाहीत, मात्र त्यांच्या या लेखी संदेशाने पाश्चिमात्य देशांमध्ये खळबळ उडाली आहे.
'शहीदांसाठी बदला घेणारच'
आपले वडील अली खामेनी यांच्या मृत्यूचा उल्लेख करत मोजताबा म्हणाले, "आम्ही आमच्या शहीदांच्या रक्ताचा बदला घेण्यास विसरलेलो नाही. शेजारील देशांशी मैत्री करण्यावर आमचा विश्वास आहे, पण अमेरिकन तळांवरील आमचे हल्ले सुरूच राहतील. आम्ही शत्रूकडून भरपाई घेऊ आणि त्यांनी नकार दिला तर त्यांच्या मालमत्ता जप्त करू. गरज पडल्यास शत्रूच्या मालमत्तेचा विध्वंसही करू."
होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवणार!
जगातील व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवण्यावर मोजताबा यांनी भर दिला आहे. "होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचे अस्त्र आम्ही आमच्याकडेच ठेवणार आहोत आणि वेळ पडल्यास युद्धाच्या इतर आघाड्याही उघडल्या जातील," असे त्यांनी स्पष्ट केले.
कसा झाला अली खामेनींचा अंत?
अमेरिकन आणि इस्रायली हवाई दलाने तेहरानमधील राष्ट्राध्यक्ष निवासावर केलेल्या भीषण हल्ल्यात आयतुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. रमझानच्या १० व्या दिवशी हा हल्ला झाला, ज्यावेळी खामेनी आपल्या कुटुंबासोबत होते. या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही मारले गेले. सायप्रस मधील इराणच्या राजदूतांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात मोजताबा खामेनी स्वतःदेखील जखमी झाले होते.