"...बर्दाश्त नही करेंगे"; इस्रायल, डोनाल्ड ट्रम्प यांना सौदी अरेबियाची खुली धमकी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 13:21 IST2025-02-05T13:21:23+5:302025-02-05T13:21:58+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी एक धक्कादायक विधान केले होते. यात, अमेरिका युद्धात उद्धवस्त झालेल्या गाझा पट्टीवर कब्जा करेल आणि तिचा आर्थिक पुनर्विकास करेल, असे म्हटले होते. ही घोषणा त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत एका संयुक्त पत्रकार परिषदेत केली होती...

"...बर्दाश्त नही करेंगे"; इस्रायल, डोनाल्ड ट्रम्प यांना सौदी अरेबियाची खुली धमकी!
पॅलेस्टाइन राज्याच्या स्थापनेशिवाय आपण इस्रायलसोबत कुठलेही संबंध प्रस्थापित करणार नाही, असे सौदी अरेबियाने बुधवारी (5 फेब्रुवारी) एका निवेदनातून स्पष्ट केले आहे. महत्वाचे म्हणजे, सोदीची ही प्रितिक्रिया अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानानंतर आली आहे. आता सौदी अरेबिया पॅलेस्टिनी राज्याची मागणी करत नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला होता.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी एक धक्कादायक विधान केले होते. यात, अमेरिका युद्धात उद्धवस्त झालेल्या गाझा पट्टीवर कब्जा करेल आणि तिचा आर्थिक पुनर्विकास करेल, असे म्हटले होते. ही घोषणा त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत एका संयुक्त पत्रकार परिषदेत केली होती. एवढेच नाही तर, पॅलेस्टिनी नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी वसवल्यानंतर, अमेरिका गाझावर आपले नियंत्रण प्रस्थापित करेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले होते.
सौदीची कडक भूमिका -
रॉयटर्सच्या वृत्तानंतर, ट्रम्प यांच्या या विधानानंतर, सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचीही प्रतिक्रिया आली आहे. सौदीने म्हटले आहे की, "युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी स्पष्टपणे राज्याच्या स्थितीची पुष्टी केली आहे. सौदी अरेबियाची भूमिका ठाम आहे आणि पॅलेस्टिनींना त्यांच्या भूमीवरून विस्थापित करण्याचा कोणताही प्रयत्न सौदी अरेबिया स्वीकारणार नाही."
निवेदनात म्हणण्यात आले आहे की, "सौदी अरेबिया पॅलेस्टिनी लोकांप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे आणि पॅलेस्टिनी राज्याच्या स्थापनेशिवाय इस्रायलसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध प्रस्थापित करण्याची शक्यता पूर्णपणे नाकारतो,"
इस्रायल-सौदी संबंध -
ट्रम्प यांच्या सोबतच्या संयुक्त पत्रकारपरिषदेत बोलताना इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, इस्रायल सौदी अरेबियाच्या सोबतीने यशस्वी प्रयत्न करेल. मात्र, ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झालेल्या गाझा युद्धानंतर, सौदी अरेबियाने इस्रायलसोबतचे संबंध सामान्य करण्याच्या प्रयत्नांना थंड बासनात टाकले आहे. तेव्हापासूनच अरब देशांच्या मनात इस्रायलच्या आक्रामक भूमिकेप्रति संताप आहे.