"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 20:52 IST2025-12-14T20:38:53+5:302025-12-14T20:52:57+5:30
पाकिस्तान अणुशक्ती असलेला देश आहे. भारतीय वायूसेना आता पाकिस्तानी हवाई हद्दीत घुसण्याची हिंमत करणार नाही." असेही तो म्हणाला.

"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ
जगभरात दहशतवाद पसरवण्यासाठी कुख्यात असलेल्या पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे. पाकिस्तानस्थितदहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा (LeT) दहशतवादी अब्दुल रऊफ, याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हडिओमध्ये तो भारताविरुद्ध गरळ ओकताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो 'दिल्लीला 'दुल्हन' बनवण्याची म्हणजे रक्तरंजित करण्याची भाषा बोलत आहे. एवढेच नाही तर, तो "आमच्यासमोर भारताचे S-400 आणि राफेल काहीच नाहीत," असेही म्हणताना दिसत आहे.
रऊफ हा लष्करचा प्रमुख आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचा जवळचा मानला जातो. विशेष म्हणजे, ऑपरेशन सिंदूरनंतर मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कबरीवर तो कलमा पढताना दिसला होता. त्याच वेळी पाकिस्तानी सेनेचे अनेक अधिकारीही तेथे उपस्थित होते.
भडकाऊ विधान -
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या भडकाऊ व्हिडिओमध्ये रऊफने म्हणतो, "काश्मीरमधील युद्ध संपलेले नाही, जो लोक असा विचार करत आहेत, ते चुकीचे आहेत. काश्मीरमध्ये हिंसाचार सुरूच राहणार." हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की याचा हवाला देत रऊफ म्हणतो, "भारताच्या राजधानीवर कब्जा करणे हेच दहशतवादी संघटनेचे उद्दिष्ट आहे. राफेल विमान, S-400 एअर डिफेन्स सिस्टिम आणि ड्रोनसारखी भारतीय शस्त्रास्त्रे, हे सर्व आमच्यासमोर काहीच नाहीत. पाकिस्तान अणुशक्ती असलेला देश आहे. भारतीय वायूसेना आता पाकिस्तानी हवाई हद्दीत घुसण्याची हिंमत करणार नाही." असेही तो म्हणाला.
मे महिन्यात पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर चालवले होते, ज्यात अनेक पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. यानंतर दहशतवाद्यांच्या कबरीवर रऊफ कलमा पठण करताना दिसला होता. त्याच्या मागे पाकिस्तानी लष्करी अधिकाही उभे असल्याचे दिसून आले होते.