टॅरिफमधून आम्ही ६०० अब्ज डॉलर्स कमावले...; ट्रम्प यांनी आकडा जाहीर करताच, अमेरिकनांचे डोळे विस्फारले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 08:54 IST2026-01-06T08:53:55+5:302026-01-06T08:54:19+5:30
Donald Trump Tariff News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ धोरणाचे समर्थन केले आहे. आयात शुल्कातून ६०० अब्ज डॉलर्सचा विक्रमी महसूल मिळाल्याचा दावा. वाचा सविस्तर माहिती.

टॅरिफमधून आम्ही ६०० अब्ज डॉलर्स कमावले...; ट्रम्प यांनी आकडा जाहीर करताच, अमेरिकनांचे डोळे विस्फारले...
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या आक्रमक व्यापारी धोरणांचे जोरदार समर्थन केले आहे. "आयात शुल्कामुळे अमेरिका आज अधिक शक्तिशाली बनली आहे," असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. गेल्या काही काळात लागू केलेल्या विविध टॅरिफ्समुळे अमेरिकन सरकारने तब्बल ६०० अब्ज डॉलर्सचा महसूल जमा केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यांच्या या विधानामुळे जागतिक बाजारपेठेत आणि विशेषतः निर्यातदार देशांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट आणि भाषणांतून वारंवार हे स्पष्ट केले आहे की, अमेरिका प्रथम या धोरणांतर्गत आयात शुल्क वाढवणे हे देशाच्या आर्थिक हिताचे आहे. त्यांच्या मते, यामुळे केवळ सरकारी महसूलच वाढला नाही, तर अमेरिकेतील स्थानिक उद्योगांनाही बळकटी मिळाली आहे. ६०० अब्ज डॉलर्सचा हा आकडा अमेरिकेच्या इतिहासातील टॅरिफद्वारे मिळवलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा महसूल असल्याचे मानले जात आहे.
जागतिक बाजारपेठेवर काय परिणाम होणार?
ट्रम्प यांच्या या धोरणामुळे चीन, युरोप आणि आशियाई देशांमधून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर मोठा कर लादला गेला आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. याचा फटका अमेरिकन नागरिकांनाच बसत आहे. त्यांना खिशातून जास्त पैसे मोजावे लागत आहेत. मात्र, ट्रम्प यांनी हे स्पष्ट केले आहे की, जे देश अमेरिकेशी व्यापार करू इच्छितात, त्यांना आता अमेरिकेच्या अटी मान्य कराव्या लागतील किंवा उच्च शुल्क भरावे लागेल.