इस्रायल-इराण युद्धात पाकिस्तानची एन्ट्री? राजनैतिक अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्यास 'धुलाई' करण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 08:19 IST2026-03-28T08:18:36+5:302026-03-28T08:19:36+5:30
इराण-इस्रायल युद्धात पाकिस्तानची उडी! तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ झालेल्या हल्ल्यानंतर इस्लामाबादने इस्रायलला 'धुलाई' करण्याची धमकी दिली आहे.

इस्रायल-इराण युद्धात पाकिस्तानची एन्ट्री? राजनैतिक अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्यास 'धुलाई' करण्याचा इशारा
मध्यपूर्वेतील युद्ध आता अधिकच चिघळताना दिसत आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या कथित हवाई हल्ल्यांनंतर आता पाकिस्तानने आक्रमक पवित्रा घेतला आहे. "पाकिस्तान हा काही कतार नाही, आमच्या दूतावासाला किंवा राजनैतिक अधिकाऱ्यांना इजा पोहोचली, तर इस्रायलची गाठ आमच्याशी आहे. आम्ही त्यांची जोरदार धुलाई करू," अशा शब्दांत पाकिस्तानने इस्रायलला थेट इशारा दिला आहे.
दूतावासाजवळ स्फोट अन् पाकिस्तानात खळबळ
गुरुवारी तेहरानच्या मध्यवर्ती भागात इस्रायल आणि अमेरिकेने भीषण हवाई हल्ले केले. हे हल्ले ज्या भागात झाले, तिथेच पाकिस्तानचे दूतावास आणि पाकिस्तानी राजदूतांचे निवासस्थान आहे. या स्फोटांच्या तीव्रतेने दूतावासाची इमारत हादरली. सुदैवाने, या हल्ल्यात पाकिस्तानी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे संतापलेल्या 'पाकिस्तान स्ट्रॅटेजिक फोरम'ने अधिकृतपणे आपली भूमिका मांडत इस्रायलला परिणामांची भीती घातली आहे. "जगात कुठेही आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना धोका निर्माण झाला, तर पाकिस्तान शांत बसणार नाही," असे इस्लामाबादने स्पष्ट केले आहे.
इराणमध्ये रक्ताचा सडा; ट्रम्प यांचा नवा अल्टीमेटम
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला २८ दिवस पूर्ण झाले असून हे युद्ध भीषण वळणावर पोहोचले आहे. शनिवारी रात्री इस्रायलने इराणच्या नागरी अणुकार्यक्रमाला लक्ष्य केले. या हल्ल्यात एका गर्भवती महिलेसह डझनभर नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ६ एप्रिलपर्यंतची नवी मुदत दिली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा न उघडल्यास इराणच्या वीज प्रकल्पांवर विध्वंसक हल्ले करण्याची धमकी ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.
मध्यस्थी की युद्धात सहभाग?
विशेष म्हणजे, पाकिस्तान एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थी करण्याचे प्रयत्न करत आहे. दोन्ही देशांनी इच्छा व्यक्त केल्यास चर्चेसाठी यजमानपद भूषवण्याची तयारीही पाकिस्तानने दर्शवली आहे. मात्र, तेहरानमधील ताज्या घडामोडींनंतर पाकिस्तानचा सूर बदललेला दिसत असून, हे युद्ध आता केवळ दोन देशांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण आखाती प्रदेशाला कवेत घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.