पश्चिम आशियात युद्ध चिघळणार? अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका आणि मिसाईल डिस्ट्रॉयर इराणच्या दिशेने रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 17:51 IST2026-03-28T17:49:05+5:302026-03-28T17:51:36+5:30
इराणसोबत युद्ध थांबवण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सांगत असले तरी पश्चिम आशियात वेगळ्या घटना घडताना दिसत आहे. अमेरिकेची एक मोठी युद्धनौका पश्चिम आशियाच्या दिशेने रवाना झाली आहे.

पश्चिम आशियात युद्ध चिघळणार? अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका आणि मिसाईल डिस्ट्रॉयर इराणच्या दिशेने रवाना
US Iran News: अमेरिकेची लढाऊ विमानवाहू युद्धनौका यूएसएस जॉर्ज एचडब्ल्यू बुश पश्चिम आशियाच्या दिशेने कूच करत आहे. सीबीएस न्यूजने याबद्दलचे वृत्त दिले आहे. यूएसएस जॉर्ज एचडब्ल्यू बुश ही विमानवाहू युद्धनौका ८० पेक्षा जास्त विमाने वाहून नेऊन शकते.
अमेरिका नौदलाची दोन मिसाईल डिस्ट्रॉयर, यूएसएस डोनाल्ड कूक आणि यूएसएस मेसन या दोन युद्धनौकाही अमेरिकेच्या किनाऱ्यावरून रवाना झाल्या आहेत. या युद्धनौका इराणमध्ये सुरू असलेल्या युद्ध मोहिमेत सामील होणार असल्याची माहिती आहे.
इराणमधील युद्धात युद्धनौका उतरणार
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सीबीएसला सांगितले की, "ही विशाल युद्धनौका आणि त्यावरील टास्क फोर्सचे तैनात करण्यापूर्वीचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता इराणमध्ये अमेरिकेच्या मोहिमेमध्ये ते उतरणार आहेत."
रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, आणखी एक यूएसएस रॉस ही युद्धनौका गेल्या आठवड्यात अमेरिकेतून रवाना करण्यात आली आहे. पण, ही युद्धनौका सध्या कुठे आहे, याबद्दलची माहिती गोपनीय ठेवण्यात आले आहे.
अमेरिकेच्या सौदीतील लष्करी तळावर इराणचा हल्ला
इराणने सौदी अरेबियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला केला. प्रिन्स सुलतान हवाई तळावर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात अमेरिकेचे १२ जवान जखमी झाले आहेत. यापूर्वी १० जवान जखमी झाल्याची माहिती दिली गेली होती.
जखमी झालेल्या सैनिकांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले गेले आहे. वॉल स्ट्रीट जर्नल रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ज्यावेळी हा हल्ला झाला, त्यावेळी हे जवान तळावरील एका इमारतीमध्ये होते. इराणकडून एक मिसाईल आणि अनेक ड्रोन डागण्यात आले.
न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, या हवाई हल्ल्यात अनेक विमानांचे नुकसान झाले आहे. ही विमाने हवेत दुसर्या विमानात इंधन भरणारी आहेत.