आणखी दोन देशांमध्ये युद्धाचा भडका उडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 06:00 IST2024-04-08T05:59:51+5:302024-04-08T06:00:33+5:30
इराणने बदला घेण्याची केली घोषणा; इस्रायल म्हणतो आम्हीही तयार आहोत

आणखी दोन देशांमध्ये युद्धाचा भडका उडणार?
जेरुसलेम : सीरियातील आपल्या दूतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर इराणइस्रायलवर हल्ला करून बदला घेण्याच्या तयारीत आहे. यासाठी इराणने क्षेपणास्त्र तयार ठेवली आहेत. जर इराणने हल्ला केलाच तर कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी देश तयार आहे, असे इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. यामुळे जगात आणखी एका युद्धाला तोंड फुटते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे ‘डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ’ मोहम्मद जमशिदी यांनी अमेरिकेला म्हटले की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या जाळ्यात अडकू नका. जर या हल्ल्यात तुमचे नुकसान होऊ नये, असे तुम्हाला वाटत असेल तर कृपया या प्रकरणापासून दूर राहा, असे त्यांनी म्हटले आहे. इराणच्या इशाऱ्यामुळे अमेरिकन सैन्य हाय अलर्टवर आहे.
नेमके काय झाले होते?
१ एप्रिल रोजी इस्रायलने सीरियातील इराणी वाणिज्य दूतावासजवळ हवाई हल्ला केला होता. यामध्ये इराणच्या दोन लष्करी कमांडरसह १३ जण मारले गेले. यानंतर इराणने इस्रायलला बदला घेण्याची धमकी दिली आहे.
सैनिकांच्या सुट्ट्याही रद्द
इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलेंट म्हणाले की, इराणने बदला घेण्याची धमकी दिली आहे. मात्र, आम्ही तयार आहोत. त्यांनी बैठक घेत युद्धसज्जतेचा आढावा घेतला. यासाठी सैनिकांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
...तर संपूर्ण मध्यपूर्वेत
युद्ध पसरेल
nइराण आणि इस्रायलमधील शत्रूत्व जगजाहीर आहेत. मात्र, आतापर्यंत दोन्ही देशांनी एकमेकांना थेट भिडण्याची हिंमत कधीच दाखवली नाही. इराणने हमासला नेहमीच पाठिंबा दिला.
nइस्रायल इराणी ठिकाणांवर हल्ले करतो. आता इराणने थेट इस्रायलला लक्ष्य केले तर सर्वात मोठा धोका म्हणजे हे युद्ध संपूर्ण मध्यपूर्वेत पसरेल आणि त्याचे परिणाम घातक होतील.