...तर पर्शियन आखात हल्लेखोरांच्या रक्ताने माखवू; इराणची अमेरिका इस्रायला थेट धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:59 IST2026-03-12T16:59:12+5:302026-03-12T16:59:50+5:30
पर्शियन आखातातील खार्ग बेट रणनीतीदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. याच ठिकाणाहून इराण त्याचे ९० टक्के कच्चे तेल निर्यात करते

...तर पर्शियन आखात हल्लेखोरांच्या रक्ताने माखवू; इराणची अमेरिका इस्रायला थेट धमकी
तेहरान - जर अमेरिका आणि इस्रायलने पर्शियन आखातात इराणच्या कुठल्याही बेटावर हल्ला केला तर आम्ही आमचा संयम गमावू असा थेट इशाराच इराणने दिला आहे. जर असा हल्ला करण्याची कुणी हिंमत केली तर इराण पर्शियन आखात हल्लेखोराच्या रक्ताने लाल करू अशी धमकी इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर गलीबाफ यांनी शत्रू राष्ट्रांना दिली आहे. गलीबाफ इराणमधील अत्यंत ताकदवान नेतृत्व मानले जाते. त्यांनी दिलेली ही धमकी मध्य पूर्वेत युद्धाची स्थिती आणखी बिघडवू शकते.
गलीबाफ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, देश किंवा मृत्यू..जर इराणच्या बेटांच्या भूमीवर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला तर आमचा संयम तुटेल. आम्ही संयम राखणार नाही आणि पर्शियन आखात हल्लेखोराच्या रक्ताने माखवू. अमेरिकन सैनिकांची हत्या डोनाल्ड ट्रम्प यांची वैयक्तिक जबाबदारी असेल असंही त्यांनी सांगत अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.
Homeland or Death!
— محمدباقر قالیباف | MB Ghalibaf (@mb_ghalibaf) March 12, 2026
Any aggression against soil of Iranian islands will shatter all restraint.
We will abandon all restraint and make the Persian Gulf run with the blood of invaders.
The blood of American soldiers is Trump's personal responsibility.
मात्र इराण कोणत्या बेटांचा उल्लेख करत आहे हे अद्याप स्पष्ट नाही. अलीकडेच रिपोर्टमध्ये अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने एक वृत्त प्रसारित झाले होते. त्यात मध्य पूर्वेतील वाढत्या तणावात अमेरिका खार्ग बेट काबीज करण्याचा विचार करू शकतो असं म्हटले होते. पर्शियन आखातात स्थित खार्ग बेट इराणसाठी महत्त्वाचे आहे. ते देशातील सर्वात मोठे तेल निर्यात टर्मिनल आहे आणि इराणच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग त्यावर अवलंबून आहे. बेटाचे नुकसान किंवा ते बंद केल्याने इराणच्या तेल निर्यातीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
खार्ग बेटावर कब्जा करणे ट्रम्प यांची इच्छा
पर्शियन आखातातील खार्ग बेट रणनीतीदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. याच ठिकाणाहून इराण त्याचे ९० टक्के कच्चे तेल निर्यात करते. ट्रम्प यांनी ४० वर्षापूर्वी १९८८ मध्ये या बेटावर कब्जा करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटीश वृत्तपत्र द गार्डियनला मुलाखत दिली होती. मी इराणशी खूप कडकपणे वागेन. ते आम्हाला मानसिक त्रास देतात आणि आम्हाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात. जर आमच्या कुठल्या माणसांवर अथवा जहाजावर गोळी चालली तर आम्ही खार्ग बेटावर हल्ला करू. मी तिथे गेलो असतो आणि बेटावर कब्जा केला असता असं त्यांनी म्हटलं होते.