पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:14 IST2025-10-01T17:13:08+5:302025-10-01T17:14:15+5:30
ईरान, रशिया आणि तुर्की यांसारख्या देशांनी ड्रोन तंत्रज्ञानात मोठी आघाडी घेतल्याचे दिसते.

पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
खरे तर, युद्धाच्या पद्धती कालपरत्वे बदलतच असतात. आताही जगातील युद्ध पद्धतीत मोठ्या प्रमाणावर बदलत होताना दिसत आहेत. कधी काळी धनुष्य, ढाल-तलवारी, भाले, नंतरच्या काळात बंदुका आणि तोफा यांच्या सहाय्याने लढल्या जाणाऱ्या लढाया आता ड्रोनच्या सहाय्याने लढल्या जात आहेत. ईरान, रशिया आणि तुर्की यांसारख्या देशांनी ड्रोन तंत्रज्ञानात मोठी आघाडी घेतल्याचे दिसते.
विशेषत: रशियाने युक्रेन युद्धात पारंपरिक शस्त्रांपेक्षाही ड्रोनचाच यशस्वीपणे वापर केला आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. कमी खर्चात अचूक आणि यशस्वी हल्ले, हे ड्रोन युद्धाचे वैशिष्ट्य. महत्वाचे म्हणजे, यामुळे शत्रू देशाचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर केले जाऊ शकते. यामुळेच युरोपीय देशांमध्ये ड्रोनची जबरदस्त दहशत निर्माण झाली आहे.
यासंदर्भात, युरोपियन युनियनने आज डेनमार्कमध्ये एक बैठक बोलावली आहे. यात ‘ड्रोन वॉल’ तयार करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. महत्वाचे म्हणजे, रशियन ड्रोन्सने पोलंड, एस्टोनिया आणि रोमानियाच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्याच्या घटनांनंतर, ही बैठक होत आहे. खरे तर, पोलंड हा नाटोचा सदस्य आहे. मात्र, असे असूनही रशियन ड्रोन पोलंडमध्ये शिरले, यामुळे खळबळ उडाली आहे. यामुळेच आता बुल्गारिया, एस्टोनिया, हंगेरी, लातविया, लिथुआनिया, रोमानिया, पोलंड, स्लोव्हाकिया, डेनमार्क आणि फिनलंड, या रशियान सीमेवरील देशांनी एकत्र येत ‘ड्रोन वॉल’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही ‘ड्रोन वॉल’ म्हणजे अँटी-ड्रोन तंत्रज्ञान आहे. यात रडार, जॅमर आणि सेन्सर्सचा वापर होईल. यामुळे कोणत्याही ड्रोनची घुसखोरी त्वरित समजेल आणि त्याला प्रत्युत्तर दिले जाईल. युरोपियन युनियनच्या देशांमध्ये डेटा शेअरिंगसंदर्भात सहमती होईल. प्रत्येक देश ड्रोनच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाईल आणि एकमेकांना ड्रोन्सच्या एंट्री संदर्भात माहिती देईल, त्याची स्थिती काय आहे हे कळवेल.
यासंदर्भात बोलतान नाटोचे महासचिव मार्क रुट म्हणाले, आपल्याला आपले आकाश सुरक्षित ठेवावे लागेल. यासाठी ड्रोन वॉल आवश्यक आहे. मिसाइल्सवर अब्जावधी डॉलर्स खर्च करण्याऐवजी कमी खर्चात ड्रोन वॉल प्रभावी ठरेल. युक्रेनच्या अनुभवांचा वापर करून ही वॉल विकसित केली जाऊ शकते. मात्र, ती कशी असेल, कधी पूर्ण होईल आणि किती खर्च येईल, हे अद्याप ठरलेले नाही. ड्रोन युद्धाने युरोपसमोर नवे आव्हान उभे केले आहे आणि ‘ड्रोन वॉल’ हे त्याचे उत्तर ठरू शकेल!